विंग कमांडर अभिनंदन यांनीच पडले 'ते' एफ-१६ विमान; हवाई दलाचा दावा
   दिनांक :06-Apr-2019
नवी दिल्ली:
 
पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली सगळी एफ-१६ विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला आहे. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने केलेला प्रतिहल्ला परतवून लावत असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ-१६ विमान पाडले होते. तसेच भारतावर हल्ला करण्यासाठी आलेल्या एफ-१६ विमानांपैकी एक विमान परत माघारी फिरले नसल्याचे पाकिस्तानी हवाई दलाच्या रेडिओ संभाषणातून उघड झाले आहे, असा दावा हवाई दलाच्या सूत्रांनी केला आहे.
 
२७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत एक-१६ विमान कोसळलेच नसल्याचा तसेच पाकिस्तानच्या ताफ्यातील सगळी एफ- १६ विमाने सुरक्षित असल्याचा दावा एका मासिकाने केल्याने खळबळ उडाली होती. मात्र भारतीय हवाई दलाने हा दावा फेटाळून लावला आहे. ''विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-१६ विमान पाकव्याप्त काश्मीरच्या ७ ते ८ किमी आत असलेल्या सब्झकोट भागात पाडले होते. तसेच पाकिस्तानी हवाई दलाचे रेडिओ संभाषण आम्ही रेकॉर्ड केले असून, त्या संभाषणामधून भारतावर हल्ला करणाऱ्या एफ-१६ विमानांपैका एक विमान माघारी आले नसल्याचे स्पष्ट होत आहे , असा दावा भारतीय हवाई दलामधील सूत्रांनी केला आहे.