भारतीय राजकारण...!
   दिनांक :06-Apr-2019
देशात सतराव्या लोकसभेसाठी निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान चारच दिवसांनी म्हणजे 11 एप्रिल रोजी होणार आहे. विदर्भातील सात मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाग्य पहिल्या टप्प्यातच मशीनबंद होणार आहे. यंदाची निवडणूक तशी अभूतपूर्व आहे. पंतप्रधान मोदी विरुद्ध सगळे, अशी ही वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक आहे. एका व्यक्तीला हरविण्यासाठी परस्परविरोधी विचार असलेले शेकडो नेते एकत्र आले आहेत. एरवी एकमेकांना शिव्या घालणारे आता गळ्यात गळा घालून फिरत आहेत. मांडीला मांडी लावून बसत आहेत. सगळे मिळून मोदींना, भाजपाला आणि संघाला शिव्या घालत आहेत. मोदीविरोधकांचा एक समान अजेंडा आहे. तो म्हणजे मोदींचा पराभव करणे. पण, मोदींचा पराभव केल्यानंतर सत्ता कुणी सांभाळायची, याबाबत त्यांच्यात गोंधळाची स्थिती आहे. या स्थितीचा लाभ भाजपाला होईल का, हे 23 मे रोजी स्पष्ट होईल.
 
 
 
आघाडी झाली. महाआघाडीही झाली. मोर्चेही तयार झाले. अनेक राज्यांमध्ये तर परस्परविरोधी विचारांचे लोक एकत्र आले. मोदीविरोधाने आंधळे झालेल्या या लोकांना सत्तालोभ एकत्र घेऊन आला आहे. कॉंग्रेस हा देशातला सगळ्यात जुना पक्ष. कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला. हे दोन्ही पक्ष भाजपा-शिवसेना युतीविरुद्ध एकत्र आले आहेत. गेल्यावेळी वेगळे लढल्याचा फटका बसल्याने यावेळी ते एकत्र आले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना स्वत:च्या क्षमतेवर विश्वास नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोबत घेतले. पश्चिम महाराष्ट्रात भाजपा-सेनेची ताकद वाढल्याने तिथे आघाडीने राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आघाडी केली. इकडे अमरावतीमध्ये अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानीला त्यांनी सोबत घेतले. अमरावती मतदारसंघ तसा राष्ट्रवादीच्या वाट्याचा. पण, तिथे लढवायला त्यांच्याकडे उमेदवार नसल्याने त्यांनी राणांची पत्नी नवनीत कौर राणा यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला. राजू शेट्टी हे शेतकर्‍यांचे नेतृत्व करतात. रवी राणा हे तरुणाईची चळवळ राबवितात. हितेंद्र ठाकूर सत्तालोलुप आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वत:ला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले आहे.
निवडणूक ही लोकशाहीत सर्वात महत्त्वाची मानली जाते. जे पक्ष राजकारणात आहेत, त्यांनी तर ही निवडणूक लढायचीच असते. पण, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत स्वत:साठी सक्रिय नाही. राज यांच्या मनसेने स्वत:ला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याचे दुर्दैवी चित्र दिसते आहे. उत्तरप्रदेशखालोखाल महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. उत्तरप्रदेशात 80 आहेत, तर महाराष्ट्रात 48. पण, या 48 पैकी एकाही मतदारसंघात मनसेने उमेदवार उभा केलेला नाही. त्यांचा गड मानल्या जाणार्‍या मुंबईतही नाही. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज ठाकरे गुजरातला भेट देऊन आले होते. तिथून आल्यानंतर ते अनेक दिवसपर्यंत गुजरातच्या विकासाचे गोडवे गात होते. एवढेच काय, नरेंद्र मोदी जेव्हा आंघोळ करतात, तेव्हा त्यांच्या शरीरावरून खाली पडणारे पाणी ओंजळीत घेऊन तीर्थ म्हणून कॉंग्रेस-राकॉंच्या नेत्यांनी प्यावे, असे विधानही त्यांनी केले होते. पण, आता अचानक त्यांना काय झाले, कुणास ठाऊक? ज्या राष्ट्रवादीला, ज्या पवारांना ते शिव्या घालत होते, ते त्यांचे गोडवे गात आहेत अन्‌ मोदींना शिव्या घालत आहेत. मोदी-शाह यांना पराभूत करण्याचे आवाहन करीत आहेत. हे एक गौडबंगालच आहे. सतर्क नागरिकांनी याचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे थोडे तळाशी जाऊन बघितले पाहिजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी भाषणशैली लाभलेला, उत्तम असा व्यंग्यचित्रकार अचानक देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध बोलतो, हे अनाकलनीय आहे.
आता महाराष्ट्रात सगळेच्या सगळे विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आहेत, असेही नाही. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दिन ओवैसी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे पक्ष एकत्र आले आहेत. वंचित बहुजन आघाडी या नावाने त्यांनी स्वत:ची वेगळी चूल मांडली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर त्यांच्या जाहीर सभांना दणदणीत प्रतिसादही मिळत आहे. विदर्भ याला अपवाद आहे. कारण, विदर्भात विशेषत: पूर्व विदर्भात यांना अजून तरी काही स्थान असल्याचे दिसत नाही. पश्चिम विदर्भात, विशेषत: अकोल्यात आंबेडकरांचे बर्‍यापैकी अस्तित्व आहे. एमआयएम हा पक्ष मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करतो, तर आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ प्रामुख्याने दलितांचे नेतृत्व करतो. एकेका समुदायाचे, एकेका पंथाचे नेतृत्व करणारे छोटेछोटे पक्ष फक्त महाराष्ट्रातच आहेत, असे नाही. ते अन्य राज्यांतही आहेत. उत्तरप्रदेशातही अपना दल आहे. निषाद पार्टी आहे. अपना दल आधीपासूनच भाजपासोबत रालोआत आहे. निषाद पार्टी आतापर्यंत सपा-बसपासोबत होती. आता या पार्टीने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुहेलदेव समाज पार्टी नावाचाही एक छोटा पक्ष आहे. हे छोटे पक्ष वा गट एकेका समाजाचे नेतृत्व करतात. ज्या भागात त्यांचा प्रभाव आहे, तिथे ते िंजकण्याची वा प्रमुख पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे भाजपाला काय िंकवा अन्य कुणाला काय, त्यांची साथ घ्यावी लागते.
समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, अपना दल, निषाद पार्टी, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, द्रमुक, अण्णाद्रमुक असे जे सगळे पक्ष आहेत, ते कोणत्या समुदायाचे, समाजाचे नेतृत्व करतात, हे ओळखणे तसे कठीण नाही. रामविलास पासवान, अजितिंसह, जीतनराम मांझी, उपेंद्र कुशवाहा, ओमप्रकाश चौटाला हे जे नेते आहेत, त्यांची बांधिलकी कुणाशी आहे, हेही सर्वज्ञात आहे. वर्षानुवर्षे अशा पक्षांची संख्या ही वाढतच चालली आहे. या पक्षांनी थोडासाही जनाधार तयार केला तर राष्ट्रीय पक्षांना त्यांच्याशी तडजोड करावी लागते. अनेकदा तर मान्य नसलेल्या तडजोडीही स्वीकाराव्या लागतात. प्रादेशिक पक्षांमुळेे भाजपा, कॉंग्रेस यासारख्या प्रमुख राजकीय पक्षांची कसोटी लागत आहे. आंध्रप्रदेश, तेलंगाणा, ओरिसा, बंगाल, तामिळनाडू अशा काही प्रमुख राज्यांमध्ये आजही प्रादेशिक पक्षांचा बोलबाला आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये यश मिळविणे भाजपा आणि कॉंग्रेसलाही अवघड आहे. बर्‍याच प्रयत्नांनंतर बंगालमध्ये भाजपाने आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. 42 जागांपैकी दहापेक्षा जास्त जागा भाजपाला मिळतील, याबाबत शंका नाही. पण, त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर अन्य ठिकाणी होणारे नुकसान भाजपाला भरून काढता येणार आहे.
उत्तरप्रदेशात सुहेलदेव राष्ट्रीय समाज पार्टी भाजपासोबत आहे. या पार्टीचे नेते ओमप्रकाश राजभर हे योगी मंत्रिमंडळात मंत्री आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत राजभर यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती. राजभर यांना निवडून दिले तर कॅबिनेट मंत्री करू, असे आश्वासन गडकरी यांनी त्याच सभेत दिले होते आणि ते पाळलेही. पण, राजभर यांच्या पक्षाने भाजपाची डोकेदुखी वाढविली आहे. कुठल्या ना कुठल्या मुद्यावरून राजभर भाजपावर टीका करत असतात. पण, राजभर समाजाची मतं इकडे तिकडे जाऊन नुकसान होऊ नये यासाठी भाजपा गप्प आहे. असे जे लहान लहान पक्ष आहेत, ते एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीप्रमाणे चालतात आणि प्रसंगी उमेदवारी विकतातदेखील. आपल्या महाराष्ट्रातही महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. तो धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतो. असे जाती-जातीचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष वाढत गेले तर जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे उद्या काय होईल, याचा विचार आतापासूनच झाला पाहिजे. राजकारण हे जात-पातविरहित, प्रांत-भाषाभेदविरहित, धर्म-पंथभेदविरहित असायला हवे. आपल्या देशात प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुणी कोणता पक्ष काढावा, निवडणूक लढवावी, हाही ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा विषय आहे. असे असले तरी व्यापक देशहित लक्षात घेता जात, धर्म यावर आधारित राजकीय पक्षांचा सुळसुळाट देशाला परवडणारा नाही, हे लक्षात घेतलेच पाहिजे.
देश स्वतंत्र झाला तेव्हापासून कित्येक वर्षे भारतात कॉंग्रेसचा एकछत्री अंमल होता. कॉंग्रेसची स्थापना 1885 सालीच झाली होती. त्यामुळे कॉंग्रेसकडे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. याउलट स्थिती इतर पक्षांची आहे. देशातील प्रत्येक राज्यात आणि केंद्रात पाच दशकांपेक्षा जास्त काळ कॉंग्रेसचीच सत्ता राहिली. भाजपाची स्थापना तर 1980 साली झाली. प्रारंभीची अनेक वर्षे भाजपावर शहरी लोकांचा, व्यापारी-बनिया लोकांचा पक्ष असल्याची टीका झाली. सगळी टीका सहन करत, हेटाळणी सहन करत भाजपाने दमदार वाटचाल केली आणि परिस्थिती स्वत:साठी अनुकूल करवून घेतली. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या तारुण्यात जी प्रचंड मेहनत घेतली, ती फळास आली आणि अटलजी पंतप्रधान झाले, अडवाणी उपपंतप्रधान झाले. आजही केंद्रात भाजपाचीच सत्ता आहे. जवळपास 17 राज्यांमध्येही भाजपाचीच सरकारं आहेत. हे सगळं रात्रीतून घडलं नाही. भाजपानं परिश्रमपूर्वक जनाधार वाढविला. जसा शहरी भागात वाढविला, तसाच तो ग्रामीण भागातही वाढविला. आता कॉंग्रेसची स्थिती वाईट आहे. जनाधार गमावलेल्या कॉंग्रेसपुढे अस्तित्वाची लढाई लढण्याचा प्रश्न आहे. कधीही मंदिरात न गेलेले राहुल गांधी सगळीकडच्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन करीत आहेत. प्रियांका गांधी-वढेरा यासुद्धा मंदिरांत जात आहेत. िंहदुहिताकडे कायम दुर्लक्ष करणार्‍या कॉंग्रेसला आता हिंदुहिताचे महत्त्व पटले आहे. असे असले तरी जनाधार वाढविण्यासाठी नेमके काय करायला हवे, हे कॉंग्रेसला सुचेनासे झाले आहे. पण, स्वत:ला जानवेधारी िंहदू घोषित करणार्‍या राहुल गांधी यांना अचानक अल्पसंख्यक ख्रिश्चन आणि मुस्लिमबहुल असलेल्या केरळातील वायनाड मतदारसंघाकडे का वळावेसे वाटले, हे कोडेही आता उलगडले आहे. स्वातंत्र्यापासून कॉंग्रेसकडे असलेला अमेठी हा मतदारसंघ अजूनही अविकसित ठेवण्यात कॉंग्रेसचाच हात आहे, हे सत्य लपून राहिलेले नाही. त्यामुळे अमेठीसोबतच आता वायनाडमधूनही निवडणूक लढवू पाहात असलेले कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी कशी कामगिरी करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
भारत हा अतिशय विशाल देश आहे. एवढ्या मोठ्या देशात विविध जाती-धर्माचे लोक राहात आहेत. वंचित आहेत, पीडित आहेत, शोषित आहेत. या सगळ्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणे कुठल्याही एका राजकीय पक्षाला शक्य नाही. मात्र, ‘सब का साथ सब का विकास’ हा नारा देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासमार्गावर पुढे नेण्याचे काम केले आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. प्रगतीपासून वंचित असणार्‍या तमाम घटकांना सोबत घेऊन काम केले गेले, तर एक दिवस त्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर होईल, हे निश्चित!
गजानन निमदेव