मतदान करा आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात सूट मिळवा
   दिनांक :06-Apr-2019
नवी दिल्ली:
 आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग जनजागृती करत आहे.  निवडणूक आयोगाच्या या उपक्रमाला सामाजिक संस्थांनी मदत करत लोकांना मतदान करण्यासाठी जागरुक करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
 
लोकसभा निवडणुकीत मतदान करा आणि जवळच्या पेट्रोल-डिझेल पंपावर प्रतिलीटर ५० पैसे सूट मिळवा अशी ऑफर ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून लोकांना देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करा आणि पेट्रोल-डिझेल दरामधील सूट मिळवा असं आवाहन असोसिएशनकडून करण्यात आले आहे.
मतदान केल्यानंतर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला ही ऑफर मिळणार आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेलवर प्रतिलीटर ५० पैसे सूट मिळणार अशी घोषणा ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून करण्यात आली आहे.
 
 
"मतदान करुन आलेल्या मतदाराला पेट्रोल, डिझेल खरेदीवर प्रतिलीटर ५० पैशांची सूट मिळणार आहे. त्यासाठी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई ग्राहकाला पेट्रोल पंपावर दाखवावी लागणार आहे", असं ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी सांगितलं. लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. मतदारांसाठी ही ऑफर मतदानाच्या दिवशी सकाळी ८ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत असणार आहे, अशी माहिती अजय बंसल यांनी दिली.