भ्रष्ट लोकच चौकीदारामुळे त्रस्त; पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला
   दिनांक :06-Apr-2019
-जवानांचे अधिकार कमी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
 
सुंदरगड:
 
६० वर्षे सत्तेत राहून भ्रष्टचाराचे नवनवे शिखर गाठणारे सरकार हवे की स्वच्छ व प्रामाणिक सरकार हवे, असा सवाल करताना, केवळ भ्रष्ट लोकच या चौकीदारामुळे त्रस्त आहेत, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी येथे चढविला. माझ्या सरकारने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला करण्याचे धाडस दाखविले, पण काँग्रेस पक्ष दहशतवादी व त्यांना आश्रय देणार्‍यांचे मनोबल वाढवून आपल्या जवानांचे खच्चीकरण करीत आहे, असा स्पष्ट आरोपही पंतप्रधानांनी केला.
  
 
ओडिशाच्या सुंदरगड येथे आयोजित भव्य जाहीर सभेला ते संबोधित करीत होते. सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा रद्द करण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. जवानांचे मनोबल कमी करून, अतिरेकी आणि देशविरोधी कारवाया करणार्‍यांना पाठीशी घालण्याचाच हा प्रकार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
 
मागील ६० वर्षांच्या काळात अनेक सरकार आले आणि गेले, पण कुणीही अतिरेक्यांना धडा शिकविण्यासाठी हद्द ओलांडण्याचे धाडस केले नाही. काँग्रेसने तर नेहमीच पाकिस्तान आणि त्यांच्या भूमीत आश्रयात असलेल्या अतिरेक्यांना, तसेच भारतातील फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिला आहे. माझे सरकार देशाच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. विकास हाच आमचा सिद्धांत आहे. त्यामुळे तुम्हाला विकासाभिमुख, स्वच्छ आणि पारदर्शक सरकार हवे की, भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकार, याचा निर्णय जनतेला आगामी लोकसभा निवडणुकीत घ्यायचा आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
 
यावेळी ओडिशातही कमळ फुलणार आहे. येथील जनतेचा भाजपावर विश्वास आहे. मी खात्रीने सांगू शकतो की, ओडिशातील जास्तीत जास्त जागांवर भाजपाचेच उमेदवार विजयी होणार आहेत, असेही त्यांनी विश्वासाने सांगितले.
दिग्गजांच्या आशीर्वादानेच नवनवी शिखरे गाठली
 
भाजपाचा आज स्थापना दिवस आहे. दीनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जगन्नाथराव जोशी, राजमाता शिंदे आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या महान नेत्यांच्या मार्गदर्शनात भाजपाने यशाची नवनवीन शिखरे गाठली आहेत. काही वर्षांपूर्वी देशावर एकछत्री राज्य करणार्‍या काँग्रेसपुढे  भाजपाच्या रूपात ठोस आणि सक्षम पर्याय उभा राहिला आहे. भाजपाने नेहमीच लोकशाहीचे रक्षण केले आहे. आणिबाणीचा निषेध नोंदविण्यातही भाजपाचे नेतेच आघाडीवर होते, यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.