एक तरी लेक असावी
   दिनांक :06-Apr-2019

बा

ळा, आज आमच्या जन्माचं सार्थक झालं असंच म्हणतो मी. तू मुलगी असूनही आमचं नाव उज्ज्वल केलंस.
दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर दूरदर्शन आणि वृत्तपत्राच्या पत्रकारांना आत्मविश्वासाने उत्तरे देणार्‍या तुला पहाताना तुझी आई तर अत्यानंदाने पत्रकारांशी एक शब्दही बोलू शकली नाही. मी मात्र पत्रकारांशी भरभरून बोललो. त्यावेळी तुझ्याबद्दल काय वाटत होतं ते शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्य! बोलता बोलता माझं मन नकळत भूतकाळात गेलं. तुझ्या जन्मापासूनचा इतिहास समोर उभा राहिला.
 
 
 
वृषाच्या म्हणजे तुझ्या आईच्या बहुतेक मैत्रिणींना एकेकच मूल होतं. शिवाय त्यातल्या सत्तर टक्के मैत्रिणींना मुली असूनही त्यांनी एकावरच थांबायचं ठरवलं होतं. पहिला मुलगा असताना आणखी मूल का हवं, हे तुझ्या आईला पटवून देणं खूप कठीण होतं. शिवाय दोघेही नोकरीला असल्याने नाहीं म्हटलं तरी व्याप तुझ्या आईलाच जास्त होणार, हेही खरं होतं. मला तर मुलगी हवी होती. यावर दोघांचे खूप वाद व्हायचे. मी विचार करून अस्वस्थ व्हायचो. असंच एका प्रेमळ संवादातील गाफील क्षणी तुझी आई दुसर्‍या मुलासाठी तयार झाली.
‘‘दुसरी मुलगीच होईल कशावरून? मुलगा झाला तर काय? आणि तुम्हाला तीन तीन बहिणी असताना मुलीची एवढी हौस का?’’ या तुझ्या आईच्या प्रश्नांना संयुक्तिक उत्तरं माझ्याकडे नव्हतीच. पण तुझी आई तयार झालीय्‌ म्हटल्यावरच मी अर्धी लढाई िंजकली होती.
माझं मन सांगतंय्‌-आपल्याला आता शंभर टक्के मुलगीच होणार आणि तीही तुझ्यासारखी गोड! मी डिलिव्हरीच्या वेळेस चांगली महिना-दीड महिना रजा घेऊन दोघींचीही काळजी घेईन. मी तुझ्या आईला पटवलं होतं. शिवाय तुझ्या आजी-आजोबांचा मला पूर्ण सपोर्ट होताच. आणि घडलंही माझ्या मनासारखं. माणसाची प्रामाणिक आणि तीव्र इच्छा असली, की देव आणि दैवही दोघेही साथ देतात. तू माझ्या आयुष्यात आलीस तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस होता. नर्सने तुला दुपट्‌ट्यात गुंडाळून वृषापाशी पलंगावर आणून ठेवलं आणि आम्ही दोघेही कौतुकाने तुझ्याकडं पहात होतो. एवढीशी तू! तुझ्या लुकलुक डोळ्यांनी पाहात होतीस. उगीचच तू माझ्याकडेच पहातेय्‌, असं मला वाटलं होतं. तुझ्या आजी-आजोबांचे कौतुकाने तुला पाहताना आनंदाश्रूंनी डबडबलेले डोळे पाहून मीही सुखावलो होतो. तेवढयात टॅहॅऽऽ टॅहॅऽऽ करत तू तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिलीस. तुझा आवाज ऐकून आजी म्हणाली-‘‘बाळाला भूक लागलीय्‌. पाजायला घे!’’ तिनेच तुला थकलेल्या वृषाच्या कुशीत दिले आणि तू शांत झालीस. असे टप्पे पार करत साधारण आठ महिन्यांची असताना बाऽबाऽबाऽ उच्चारलं होतास. त्या दिवशी हाच शब्द सारखी घोकत होतीस. तो तुझा आवाज रेकॉर्ड करून ठेवलाय्‌. उभं राहायला, दुडकी पावलं टाकायला लागलीस, तेव्हा तू बर्‍यापैकी बोलायला लागली होतीस. घरी सगळ्यात जास्त विश्वास तुझा बाबावर होता. तुला पोलिओ डोस आणि पहिलं इंजेक्शन द्यायचं होतं. डॉक्टरकडे यायला तू ठाम नकार दिला होतास. पण इंजेक्शन देणार नाही, असा भरोसा मी दिल्यावर तू तयार झालीस. पोलिओ डोस तू आनंदाने घेतलास. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यावर मात्र तू जोरात िंकचाळलीस. त्यावेळी थरथरत मला मारलेली घट्ट मिठी, तुझ्या डोळ्यात मी पाहिलेला अविश्वाचा भाव आठवून मला अजूनही अपराधी असल्यासारखं वाटतं. तुझ्याशी पहिल्यांदा खोटं बोललो होतो आणि ते तू रेड हँड पकडलं होतंस. बाबा माझा दोस्त आहे, असं तू सगळ्यांना सांगायचीस. एवढ्या लहान वयात तू कामांची वाटणी करून टाकली होतीस. जेवण आजीकडून, संध्याकाळी चक्कर मारायला आजोबा, भांडणासाठी दादा आणि अंघोळ मात्र बाबाकडून. एकदा असाच सकाळी मी फिरून आलो, तुला बळेबळेच आई आंघोळ घालायचा प्रयत्न करीत होती, आजीही मदत करीत होती. मी आल्याची चाहूल लागली मात्र, तू िंकचाळून आई आणि आजीला चक्क बाथरूमच्या बाहेर काढलं आणि आंघोळ माझ्याकडूनच करून घेतली. तीन वर्षांची झाल्यावर तुला शिशुवर्गात घातलं, तेव्हा पहिल्या दिवशी तुला एकटीला सोडून घरी येऊन दोघेही रड रड रडलो होतो. तू मात्र तिथे मस्त मजेत रमली होतीस. खेळणी, रंगीत चित्रांची पुस्तकं, नवीन मित्रमंडळी, धमाल करायचीस. शाळेतून घरी आल्यावर शाळेतल्या बाई, त्यांनी म्हणून दाखवलेली गाणी, सांगितलेल्या गोष्टी, मित्र-मैत्रिणी यांचं रसभरीत वर्णन आमच्यापुढे करायचीस. एका मुलाला पायाला थोडंसं लागलं होतं. आठवडाभर त्याला बरं झालंय्‌ का म्हणून रोज विचारायचीस. हे तुझ्या बाईंनी जेव्हा आम्हाला सांगितलं, तेव्हा केवढा अभिमान वाटला होता तुझा! तू मोठी होत होतीस. जीवनाचे एकेक टप्पे पार करत होतीस. तुझ्या बरोबरीने आम्हीही वयाने, विचारांनी मोठे होत होतो. तुझा मित्रपरिवार वाढला होता. कधी कधी तुम्ही मित्र मैत्रिणी आपल्या घरी एकत्र अभ्यास करायचे. तुमच्या गप्पा सुरू असताना आई चहा, कॉफी वगैरे देण्याच्या निमित्ताने तुझ्या खोलीत आली तर तुम्ही विषय बदलायचे. पण तुला कधीसुद्धा कुठल्याच कारणावरून रागवावं, अशी वेळ फारशी कधी आली नाही. तू मुळातच शांत, समंजस, हुशार, थोडीशी आजीबाईसारखी वागणारी आणि अभ्यासू होतीस. शाळेत पहिलीपासून तू तुझा पहिला-दुसरा नंबर कधी सोडला नाहीस. तुला दुसर्‍यांना मदत करायला, दुसर्‍यांची काळजी घ्यायला खूप आवडायचं आणि आताही तू तशीच आहेस. परीक्षेच्या वेळी तुझे मित्र-मंत्रिणी तुझ्या वह्या मागायला यायचे आणि तू त्यांना द्यायचीस. त्या वेळी आईला तुझा खूप राग यायचा. परीक्षेच्या वेळी आपल्या वह्या दुसर्‍यांना घरी न्यायला देणं हे तिला आवडत नसे. मला मात्र त्यात वावगं वाटायचं नाही. आईचंही बरोबर असायचं. तुझी एक स्वार्थी मैत्रीण तुला वेळेला कधीच मदत करीत नसे. तू मात्र शांत असायचीस. तुझा अभ्यास तयार असायचा. परीक्षेच्या काळात रात्री जागवल्या तरच अभ्यास होतो असं नाही, हे तू तुझ्या यशातून सिद्ध करायचीस. गंमत म्हणजे हळूहळू मीसुद्धा ते तुझ्याकडून शिकत गेलो. एकदा समजून घेतलेली गोष्ट डोक्यात पक्की बसली पाहिजे. शिकलेलं ज्ञान हे फक्त पुस्तकी आणि परीक्षेपुरतं मर्यादित नाही, हे तू पुढं सिद्ध केलंस.
पाचवी, सहावी वर्षे सरत होती. तुझ्यात स्त्रीसुलभ बदल दिसू लागले. माझ्या कुशीत झोपणारी तू पार्टी बदलून कधी आईच्या पार्टीत सामील झालीस ते कळलंच नाही. माझ्या लक्षात आलं-आता तुला मुलगा-मुलगी हा भेद जाणवून द्यायला हवा. कदाचित तुला हे माहीत असण्याची शक्यताही होती. मी वृषाशी तसं बोललोही, तेव्हा कळलं की आईने तुला आवश्यक ती माहिती कधीच दिलीये. मग मी निर्धास्त झालो. त्याला तसंच कारणही होतं. आम्ही शाळा-कॉलेजमध्ये असताना आमचे मित्र-मैत्रिणी, त्यांच्या घरी जाणं-येणं, बिनधास्त वावरणं असं आतासारखं नव्हतं. तू दहावीनंतर कॉलेजमध्ये जायला लागलीस. तुझं क्षितिज विस्तारलं होतं. एकमेकांच्या नोट्स शेअर करणं, एकत्र नाटक-सिनेमाला जाणं, सहलीला जाणं होत होतं. अशा वेळी पाय घसरण्याची भीती आम्हाला वाटत असे. तुझ्यावर विश्वास नव्हता असं मुळीच नाही. पण काही गोष्टी तुला सांगणं, माहीत करून देणं गरजेचं वाटलं होतं. तू तुझ्या कॉलेजच्या गोष्टी, मित्र-मैत्रिणींच्या गमतीजमती आम्हाला सांगत होतीस. तुम्हा मुला-मुलींची निखळ, निर्व्याज मैत्री पाहून आपल्या काळी असं का नव्हतं, याचं मला वैषम्य वाटायचं. मैत्रीकडे पाहण्याचा हा नवा दृष्टिकोन तूच दिलास मला!
मेडिकल की इंजिनिअरिंग अशी व्दिधा मनस्थिती तुझी झाली होती. तुझं मन खरं तर कलाकाराचं होतं. पण हुशार मध्यमवर्गीय मुलांनी डॉक्टर िंकवा इंजिनिअर व्हायचं, हा त्यावेळी प्रघातच पडलेला होता. तुझा ओढा इंजिनिअरिंगकडे होता. तू 11वी पास झालीस, तेंव्हा मला डायबेटीस डिटेक्ट झाला. इंजिनिअरिंग आणि मेडिकलमधील प्लस-मायनसवर आठवडाभर घरी सगळ्यांशी विशेषतः माझ्याशी तू सखोल चर्चा केलीस. बर्‍याच विचारांती तू मेडिकलला जायचा निर्णय घेतलास. त्या वेळी तू स्वतःचं मन मारून हा निर्णय का घेतलास ते आता कळतंय्‌. घेतलेल्या निर्णयाचं तू अक्षरशः सोनं केलंस. घर, संसार, हॉस्पिटल सांभाळून तू डायबेटीसवर संशोधन केलंस. दोन्ही घरांचं नाव उज्ज्वल केलंस. वयाच्या केवळ एकोणचाळीसाव्या वर्षी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा पद्मविभूषण पुरस्कार तुला मिळाला. माझा डायबेटीस गेली 20 वर्षे तू केलेल्या संशोधनाच्या उपचारांनी औषधं न घेता नियंत्रणात आहे. आज तुझे हजारो मधुमेही पेशंट औषधाविना डायबेटीस नियंत्रित झाल्याने सामान्य जीवन जगत आहेत. या पुरस्काराने सगळ्यांना अत्यानंद तर झाला आहेच पण तुझी आता जबाबदारीही वाढली आहे. मधुमेह नियंत्रितच नव्हे तर बराही होतो, हे तुला सिद्ध करायचंय्‌.
(लेखक साहित्यिक आहेत)