लोकसभा निवडणूक; वायनाडमध्ये राहुल विरुद्ध राहुल
   दिनांक :06-Apr-2019
वायनाड:
उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरील आव्हान आणखी कठीण झाले आहेत.  राहुल यांच्याविरोधात वायनाडमधून तीन गांधींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे यात राहुल गांधी नावाच्या उमेदवाराचाही समावेश आहे.
 
 
दक्षिण भारतात काँग्रेसची हवा निर्माण करण्याच्या हेतूनं राहुल यांनी यावेळी केरळमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केरळमधील सत्ताधारी डाव्या पक्षांनी राहुल यांना कडवी लढत देण्याचा निर्धार केला आहे. भाजपनं मित्रपक्षाच्या दिग्गज उमेदवाराला मैदानात उतरवलं आहे. त्यामुळं येथील लढत चुरशीची झाली आहे. असं असतानाच वायनाडमधून गांधी आडनावाच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. के ई राहुल गांधी, के राघुल गांधी आणि के एम शिवप्रसाद गांधी अशी या उमेदवारांची नावं आहेत. ३३ वर्षीय के ई राहुल गांधी हे कोट्टायमचे रहिवासी असून अगिला इंडिया मक्कल कझगम पक्षाचे सदस्य आहेत. ते एम फिल असून त्यांच्या खात्यात केवळ ५१५ रुपये आहेत.
के राघुल गांधी हे पत्रकार असून त्यांची पत्नी दंतचिकित्सक आहे. शिवप्रसाद गांधी हे संस्कृत विषयाचे शिक्षक असून त्यांची पत्नी कम्प्युटर ऑपरेटर आहे. हे दोघेही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.