जामिनावरील चोराच्या बोंबा!
   दिनांक :06-Apr-2019
 
 
 
 
 
1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या कपाळीचे भोग संपले, अशा समाधानाने भारतमातेने नि:श्वास टाकला असेल. पण हे समाधान अल्पकाळच टिकणार आहे, हे तिला माहीत नसावे. सोनिया-राहुल-प्रियांका या त्रिकुटामुळे, एकेकाळच्या बलाढ्य व जबाबदार कॉंग्रेस पक्षाचे आजचे हाल बघून भारतमाता उद्वेगाने आपले कपाळ बडवून घेत असेल! आजकाल तर राहुल गांधी यांच्या बोलण्याची किळसच यायला लागली आहे. आता गुरुवारी नागपुरातील ‘भव्य’ जाहीर सभेत राहुल गांधी बोलले की, राफेल करारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च वाटाघाटी करत, बोलणी करण्याची प्रक्रियाच नष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यात येईल. यात सहभागी असलेल्या चौकीदाराचीही चौकशी होईल व चौकीदार तुरुंगात जातील. कुठला घोटाळा? कुठली चौकशी? ज्या व्यवहारात महालेखाकारांना (कॅग) काही वावगे आढळले नाही, सर्वोच्च न्यायालयाने ज्या करारात काहीही घोटाळा झाला नसल्याचे म्हटले, त्यात राहुल गांधींना अजूनही घोटाळाच दिसतो आहे. हा एकतर बालिशपणा असेल, नाही तर कोडगेपणा तरी असेल. 59 हजार कोटी रुपयांतील 30 हजार कोटी रुपये नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानीच्या खिशात घातले, असे राहुल म्हणतात. म्हणजे 36 राफेल विमाने केवळ 29 हजार कोटी रुपये मूळ किमतीची होती म्हणायचे का? आपण जे आरोप करीत आहोत, ते धादांत खोटे आहेत हे माहीत असूनही वारंवार आणि ठासून करायचे, यालाही फार हिंमत  लागते. ती मात्र राहुल यांच्यात पुरेपूर आहे. स्वत: एका गंभीर आर्थिक घोटाळ्यात गुंतले असताना आणि जामिनावर सुटले असताना, दुसर्‍यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणे सोपे नाही. राफेलचा व्यवहार हा विनादलाल आणि विनालाच झालेला आहे, हे सर्वांनीच मान्य केले आहे. परंतु, कॉंग्रेसला हे मान्य करायचे नाही. तसे मान्य केले तर, यदाकदाचित कॉंग्रेस सत्तेवर आली तर, त्यांनाही मग पुढचे संरक्षण करार, अशाच प्रामाणिकपणे करावे लागतील. तसे झाले तर मग मलाईची कमाई कशी होईल? याचीच चिंता या मायलेकांना लागली आहे. कुठलाही व्यवसाय नाही की नोकरी नाही, असे असतानाही हे मायलेक कोट्यधीश कसे काय बनले, याचे उत्तरही या मलाईच्या कमाईत आहे. पैशाचा हा ओघ आटू नये, सतत वाहता असावा, यासाठी सोनिया-राहुल यांना, राफेल करारात भ्रष्टाचार झालाच आहे, हे कसेही करून सिद्ध करायचे आहे. त्यासाठीच त्यांचा हा एवढा आटापिटा सुरू आहे. या खोटारडेपणाला आता जनतेनेच आगामी निवडणुकीत नाकारले पाहिजे. राहुल गांधी म्हणाले की, राफेलचे कंत्राट अनिल अंबानीलाच का म्हणून दिले? विदर्भातील तरुण व शेतकर्‍यांना का दिले नाही? यावर आता हसावे की रडावे, हेच कळत नाही! असे उथळ आरोप ऐकण्यासाठी नागपुरात लोकही तयार नव्हते. कॉंग्रेसने मोठ्या हिमतीने कस्तुरचंद पार्क मैदानावर राहुल गांधींची सभा घेतली, पण सभेला दहा हजाराच्या आतच लोक उपस्थित होते. यावरून तरी राहुल गांधींनी बोध घ्यायला हवा की, त्यांचे तेच तेच खोटे आरोप ऐकायला आता कुणीच तयार नाही. आज राहुल गांधींनी आपली पत इतकी घसरवून टाकली आहे की, त्यांचा एकही शब्द कुणीही मनावर घेत नाही. त्यांच्या भाषणाकडे, बोलण्याकडे मनोरंजन म्हणून बघितले जाते. त्यांना लोकांनी ‘आदराने’ पप्पू ही पदवीही बहाल केली आहे. इतके होऊनही, राहुल गांधी मात्र वैशाखनंदन बनत, देशभर नरेंद्र मोदींवर अभिरुचिहीन विनोद करत फिरत आहेत. कॉंग्रेस पक्षाचे हे किती अध:पतन झाले म्हणायचे!
परंतु, या अध:पतनाला जबाबदार असलेल्या मायलेकाला जाब विचारण्याची एकाही कॉंग्रेसी नेत्यात हिंमत नाही. आमच्या पक्षाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले म्हणून फुकाची शेखी मिरविणार्‍या या पक्षातील नेत्यांच्या रक्ताचे इतके पाणी झाले आहे की, त्यांना आपल्या पक्षाचे हे धिंडवडे दिसू नये! कॉंग्रेससारखी परिस्थिती वैर्‍याचीदेखील होऊ नये.
आज अत्यंत भ्रष्टाचारी कुटुंब म्हणून सोनिया गांधी यांचे कुटुंब जगासमोर आले आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या संपुआ सरकारची कारकीर्द सर्वात वाईट आणि देशाला खड्‌ड्यात टाकणारी होती, याविषयी कुणाचेच दुमत नाही. सत्ता मिळविण्यासाठी देशालाही गहाण टाकण्यास या कुटुंबाने मागेपुढे पाहिले नाही आणि तरीही जेव्हा 2014 साली सत्ता मिळाली नाही, तेव्हापासून यांचा नरेंद्र मोदींविरुद्ध थयथयाट सुरू आहे. ज्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी हे मायलेक जामिनावर आहेत ते प्रकरणही मोठे रोचक आहे. नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र चालविणारी असोसिएट जर्नल्स कंपनी (जिची स्थावर मालमत्ता सुमारे तीन ते साडेतीन हजार कोटी आहे) कॉंग्रेस पक्षाकडून 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेते. हे कर्ज, समर्थ नाही म्हणून असोसिएट जर्नल कंपनी, यंग इंडियन नावाच्या एका कंपनीला (ज्यात सोनिया-राहुल यांची भागीदारी 76 टक्के आहे), हे कर्ज व नऊ कोटी भाग हस्तांतरित करते. म्हणजेच काय, काही दिवसांपूर्वी स्थापन झालेली यंग इंडियन्स कंपनी 90 कोटी रुपये कर्जाच्या बोज्यासह, साडेतीन हजार कोटी रुपये मालमत्तेची मालक बनते. हा घोटाळा सुब्रमण्यम स्वामी यांनी उघडकीस आणला आणि त्यांनी मायलेकांवर खटला दाखल केला. या खटल्यात हे मायलेक सध्या जामिनावर मोकळे आहेत. कुठल्याही क्षणी ते तुरुंगात जाऊ शकतात. असे असताना, राहुल गांधी यांनी, निवडून आल्यास नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठविण्याची वल्गना करावी, हे म्हणजे अतीच झाले. अशा भ्रष्टाचारी मायलेकांची घरची प्रॉपर्टी झालेल्या कॉंग्रेस पक्षाला देशद्रोही म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?
परंतु, याचाही आजकाल काही लोकांना राग येऊ लागला आहे. विरोधी पक्षांना देशद्रोही म्हणण्याची भाजपाची परंपरा नाही, असे विधान नुकतेच भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले आहे. उगीचच कोण कुणाला देशद्रोही म्हणणार आहे? इंदिरा गांधींनी तर भाजपाच्या (तत्कालीन जनसंघ) नेत्यांना तुरुंगात डांबले होते. संघावर बंदीही घातली होती. परंतु, कुणीही इंदिरा गांधींच्या कॉंग्रेसला देशद्रोही म्हटले नाही. नरिंसह राव यांनीही संघावर बंदी घातली होती. परंतु, त्यांच्याही कॉंग्रेसला कुणी देशद्रोही म्हटले नाही. मग मायलेकाच्या कॉंग्रेसलाच का म्हणून देशद्रोही म्हटले जाते, याचाही विचार झाला पाहिजे. याच मायलेकाच्या कॉंग्रेस पक्षाने िंहदूंना दहशतवादी ठरविण्याचे कारस्थान रचले, त्यापायी बरेच निरपराध लोक तुरुंगातही खितपत पडले होते, तरीही या मायलेकाच्या पक्षाला देशद्रोही म्हणायचे नाही! प्रत्येक वेळी बोटचेपी भूमिका घेत, सिद्धांतांना कुरवाळत बसणारी जनता आता राहिली नाही. समोरचा जर देशद्रोह करत असेल, तर कुठलीही दयामाया न दाखविता त्याला संपविणे, हेच आवश्यक असते. छत्रपती शिवरायांचे आम्ही वंशज आहोत. शरण आलेल्या हरामखोर शत्रूला सोडणार्‍या पृथ्वीराज चौहानांच्या उदारतेमुळे या सुवर्णभूमी भारतात गुलामगिरीची मेढ रोवली गेली, हे आम्ही विसरलो नाही. सिद्धांत तेव्हाच लागू करायचे असतात जेव्हा समोरचा कंबरेखाली वार करणारा नसेल. तो जर दुर्योधनासारखा गदायुद्धाचे नियम पाळणारा नसेल, तर भीमानेही मग का म्हणून नियम पाळावे?