पाकिस्तानच्या गोळीबारात दाम्पत्य जखमी
   दिनांक :06-Apr-2019
जम्मू:
 पाकिस्तानने आपल्या नापाक कारवाया सुरूच ठेवताना, आज शनिवारीही संघर्षविरामाचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक दाम्पत्य जखमी झाले.
 
 
 
संजीवकुमार आणि त्यांची पत्नी रिता कुमारी असे या जखमी दाम्पत्याचे नाव असून, नौशेरा सेक्टरमधील कलाल गावात पाक सैनिकांनी जोरदार गोळीबार केला. यावेळी हे दाम्पत्य त्यांच्या घरातच होते. पाकच्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्या त्यांच्या घराच्या भिंती भेदून आत शिरल्या व यात ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले, अशी माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली.
 
पाकिस्तानच्या सैनिकांनी गोळीबारासोबतच तोफांचा माराही केला. यामुळे अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला सडेतोड उत्तर दिले.