नवीनबाबूंना विश्रांती द्या; अमित शाह यांचा घणाघात
   दिनांक :07-Apr-2019
पोलोसारा:
 ओडिशाचे मुख्यमंत्री  नवीनबाबू (पटनायक) आता थकलेले आहेत, त्यांच्याकडे विकासाची दृष्टीही नाही, त्यामुळे त्यांना आता विश्रांती द्या, अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज रविवारी हल्ला चढविला.
 

 
 
ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील अस्का लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणार्‍या पोलोसारा येथे आयोजित निवडणूक सभेत ते बोलत होते. नवीन पटनायक यांच्या १९ वर्षांच्या सत्ताकाळात ओडिशात कुठेही विकास झालेला नाही. ते आता थकलेले असून, त्यांना विश्रांतीची गरज आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आता भाजपाला एक संधी देऊन बघा, मग पहा, ओडिशा विकासाच्या मार्गावर किती गतीने वाटचाल करते, असे अमित शाह यांनी सांगितले.
 
सध्या बाबूंच्या हातात ओडिशाची सूत्रे आहेत. ही बाबुगिरी संपुष्टात येत नाही, तोपर्यंत या राज्याचा विकास होणार नाही. पटनायक यांच्या सरकारमध्ये आमदार आणि खासदारांना कवडीची किंमत नाही, सरकारी अधिकारी सांगतील, तेच येथे होत असते, अशी टीकाही त्यांनी केली.