...तर ‘एफ-16’च्या क्षेपणास्त्राचे अवशेष भारतात कसे सापडले?
   दिनांक :07-Apr-2019
- संरक्षण मंत्री सीतारामन्‌ यांचा अमेरिकेला सवाल
 
नवी दिल्ली:
 पाकिस्तानची सर्व एफ-१६ विमाने सुरक्षित असल्याचा ‘फॉरेन पॉलिसी’ या अमेरिकन मासिकाचा दावा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी फेटाळून लावला आहे. एफ-१६ विमानाच्या क्षेपणास्त्राचे अवशेष भारतात कसे सापडले? असा सवाल त्यांनी अमेरिकेला विचारला आहे. शनिवारी सीतारामन्‌ यांनी एका टि्‌वटद्वारे हा सवाल केला.
 
 
 
अमेरिकन मासिकाचे वृत्त पूर्णपणे निराधार असून, हे वृत्त देण्यापूर्वी संबंधित मासिकाने माहिती आणि तथ्यांची खातरजमा करून घ्यायला पाहिजे होती. कारण, भारतीय हद्दीत अॅमराम क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले आहेत. हे क्षेपणास्त्र केवळ एफ-१६ विमानामध्येच असते. याशिवाय, भारताकडे एफ-१६ विमानाने भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचे इलेक्ट्रॉनिक सिग्नल असलेले पुरावेही आहेत, असे सीतारामन्‌ यांनी आपल्या टि्‌वटमध्ये म्हटले आहे.
 
अमेरिकास्थित ‘फॉरेन पॉलिसी’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या सर्व एफ-१६ विमानांची मोजणी झाल्याचा दावा केला होता. या मोजणीत पाकिस्तानच्या ताफ्यातील एफ-१६ विमानांची संख्या पूर्वीइतकीच असल्याचे सदर मासिकाने म्हटले होते. मात्र, भारतीय वायूदलाने या दाव्याचे खंडन केले. विमानातील कॅमेरा आणि रडारच्या पुराव्यानुसार िंवग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या बायसन मिग-२१ विमानाने पाकच्या एफ-१६ विमानाचा वेध घेतल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगत वायूदलाने अनेक पुरावे समोर ठेवले होते.