अधिकार क्षेत्रातच केल्या अधिकार्‍यांच्या बदल्या; निवडणूक आयोगाचे ममता बॅनर्जींना उत्तर
   दिनांक :07-Apr-2019
नवी दिल्ली:
 केंद्रातील भाजपा सरकारच्या आदेशानेच बंगालमधील चार पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या, असे रडगाणे गाणार्‍या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने सडेतोड उत्तर दिले आहे. या अधिकार्‍यांच्या बदल्या आम्ही नियमाच्या चौकटीत आणि आपल्या अधिकारक्षेत्रात राहूच केल्या आहेत, कुणाच्याही दबावाखाली नाही, असे आयेागातर्फे आज रविवारी स्पष्ट करण्यात आले.
 
 
 
निवडणूक आचार संहितेच्या काळात पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे अधिकार निवडणूक कायद्याने आयोगाला प्रदान केले आहेत आणि त्याच अधिकारांचा आम्ही वापर केला आहे. आम्ही कुणाच्याही दबावात नाही, हे सिद्ध करण्याची आम्हाला मुळीच गरज नाही, असे आयोगाने ममता बॅनर्जी यांना कळविले आहे.
 
ममता बॅनर्जी यांनी शनिवारी आयोगाला पत्र लिहून, केंद्र सरकारच्या दबावातच आयोगाने माझ्या चार अधिकार्‍यांची बदली केली असल्याचा आरोप केला होता.
 
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या या देशातील मतदारांच्या निवडणूक काळातील अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आयोग आणि विविध राज्य सरकारांचीच आहे. आपल्या घटनाकारांनी सर्वांच्याच जबाबदार्‍या निश्चित केल्या आहेत आणि त्या आपण पूर्ण करायलाच हव्या, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
 
या बदल्या केवळ निवडणूक काळापुरत्याच असतानाही, काही राजकीय पक्ष आणि सरकार आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करीत असतात, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आयोगावर अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही, अशी खंतही आयोगाने ममतांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.