माझ्याकडे 1.67 लाख कोटी रुपये -मोहन राज
   दिनांक :07-Apr-2019
स्विस बँकेत खाते, वर्ल्ड बँकेचे 4 लाख कोटी कर्ज
निवडणूक कोणतीही असो, हवशे-नवशे-गवशे आपण पाहिले आहेत. निवडणूक हा तसा पाहिल्यास पैशाचा खेळ. अनेक उमेदवारांजवळ अगदी दीडशे कोटींची अधिकृत संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक लढताना कबूल केले आहे. पण, तुम्ही असा एखादा अपक्ष उमेदवार पाहिला का, जो म्हणतो, माझ्याजवळ 1 लाख 67 हजार कोटी रुपये नगदी आहेत म्हणून...
या उमेदवाराचे नाव जे. मोहन राज. त्याने तामिळनाडूतील पेरुंबुदूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक अर्ज दाखल करताना आपली एवढी संपत्ती जाहीर केली आहे. शिवाय त्याचे असेही म्हणणे आहे की, मी जागतिक बँकेकडून चार लाख कोटींचे कर्जही घेतले आहे. आता बोला!
 

 
 
त्याने अगदी खुलेपणाने सांगितले आहे की, या 1.67 लाख कोटींच्या नोटा मला जी-2 स्पेक्ट्रम खरेदीतील घोटाळ्यातून मिळाल्या आहेत. एवढ्याच कशा? तर त्याचे उत्तर होते...सीएजीने नाही का, घोटाळ्याचा एवढाच आकडा सांगितला होता. समोरचा चूप. दुसरं काय करणार. तो आणखी म्हणाला, ज्या लोकांनी टू-2 घोटाळ्यात पैसे खाल्ले त्यांनी आपली संपत्ती दडवून ठेवली. मी कशाला दडवू. मी ती जनतेसमोर उजागर केली. खरं जे आहे ते मी सांगितलं. मला कशाची भीती...
जे. मोहन राज यांचा युक्तिवाद असा आहे की, अन्य उमेदवार आपली जी संपत्ती दाखवितात ती खरी मानून निवडणूक आयोग लढण्यासाठी परवानगी देते. मग मी दिलेली माहितीही खरीच आहे आणि मलाही निवडणूक लढविण्याची मुभा असली पाहिजे. मी तर कागदोपत्री नमूद केले आहे ना. माझ्याजवळील ही 1.67 लाख कोटी रुपयांची संपत्ती मी स्विस बँकेत ठेवली आहे. तुम्ही तपास करा. बँकेत ज्या भारतीयांची नावे तुम्हाला आढळतील, त्यात माझेही नाव आहे!
आता एका एनजीओने जे. मोहन राज यांच्या अर्जावरच आक्षेप नोंदविला आहे. त्यांना धंदेच काय, हेच. लुच्चे लेकाचे. त्यांचे म्हणणे आहे, एवढी धादांत खोटी माहिती देणार्‍याचा अर्ज निवडणूक आयोगाने स्विकारलाच कसा. अरे मूर्खांनो! पडताळणी अजून व्हायची आहे ना. त्यावेळी आयोग योग्य तो निर्णय घेईलच. पण, एनजीओंनी नमनालाच आक्षेप नोंदविला. तर असे आहेत हे उमेदवार जे. मोहन राज. धन्य हो...