पिण्याच्या पाण्यासाठी रोज करावा लागतो मृत्युचा सामना
   दिनांक :07-Apr-2019
डोडा:
 
पिण्याच्या पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करणे, हा अनुभव नवीन नाही, पण दोन बादल्या पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील काही गावांमधील महिलांना दररोज मृत्युचा सामना करावा लागत असतो, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

 
 
या जिल्ह्यातील पर्वतीय भागांमध्ये असलेल्या या गावांमधील महिला रोज सकाळी हातात बादल्या घेऊन काही किलोमीटरपर्यंतचे अंतर पायी चालतात. या मार्गात केव्हाही हिमकडे कोसळत असतात, शिवाय, हा भाग जंगलाचा असल्याने, श्वापदांचा हल्ला होण्याची शक्यता फार जास्त असते. या जंगलात शुद्ध पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत, या झर्‍यांचे पाणी आणण्यासाठी गावातील महिला रोजच आपला जीव मुठीत घेऊन पायपीट करीत असतात.
 
कोहरा तहसिलमधील गानोरी, कुथाल आणि नायक मोहल्ला या तीन गावांमध्ये १०० कुटुंबांचे वास्तव्य आहे. मागील सात दशकांपासून कोणत्याही सरकारने या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने, प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या गावकर्‍यांनी यावेळच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
 
या पर्वतीय भागातील रस्ते गुळगुळीत आहेत, त्यामुळे पाय घसरून खाली पडण्याचा धोकाही आहे. हिमकडे कोसळण्याच्या घटना तर येथे नेहमीच घडतात. पाण्यासाठी आम्हाला जंगलात दूरवर जावे लागते. या जंगलात श्वापदे आहेत. आतापर्यंत अनेक जण त्यांच्या हल्ल्याचे शिकार ठरले आहेत; पण पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आम्हाला नेहमीच हा धोका पत्करावा लागतो, असे गानोरी गावातील कुलसूम बेगम या महिलेने वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
 
सहा वर्षांपूर्वी आम्ही पाणी काढत असताना, अचानक मोठे हिमकडे कोसळले. मी आणि गावातील अन्य काही महिला त्याखाली दबलो होतो, पण सुदैवाने लोक मदतीला धावले आणि आम्हाला त्यातून बाहेर काढले. त्या घटनेची आठवण होताच अजूनही माझा थरकाप उडतो. जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज आहे आणि ते मिळविण्यासाठी आम्ही नेहमीच हा धोका पत्करत असतो, असेही ती म्हणाली.