देशभरात ५० ठिकाणी आयकराचे छापे; कोट्यवधींची रोकड जप्त
   दिनांक :07-Apr-2019
इंदूर :
 आगामी लोकसभा निवडणुकींच्या मुहूर्तावर आयकर विभागाने देशातील तीन राज्यात ठिकठिकांनी धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव (ओएसडी) यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला असून जवळपास १५ अधिकारी त्यांच्या घराची अद्याप झडती घेत आहेत.
 
 
मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी प्रवीण कक्कड यांच्या जयनगरमधील घरावर रात्री तीन वाजताच्या सुमारास आयकर विभागाने छापा टाकला. दरम्यान, प्रवीण कक्कड यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय आहे. प्रवीण कक्कड यांच्याशिवाय कमलनाथ यांचा भाचा रातुल पुरी, अमीरा ग्रुप आणि मोजेर बेयर यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.
 
 
आयकर विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या आयकर विभागाने तब्बल ५० ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरापासून सुरू असलेली ही कारवाई अद्याप सुरूच आहे. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी प्रवीण कक्कर यांच्यासह रातुल पुरी, अमिरा ग्रुप आणि मोसेर बायर यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळशिवाय गोवा आणि दिल्लीतील ३५ ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या देशभरातील कारवाईसाठी तब्बल ३०० आयकर आधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
दरम्यान, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ विराजमान झाल्यानंतर भुपेंद्र गुप्ता यांच्याजागी प्रवीण कक्कड यांची ओएसडी नियुक्ती करण्यात आली होती. प्रवीण कक्कर यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते.