भारत आणखी एक हल्ला करू शकतो; पाकिस्तानने व्यक्त केली भीती
   दिनांक :07-Apr-2019
इस्लामाबाद: 
 
भारत १६ ते २० एप्रिल या काळात पाकिस्तानवर आणखी एक हल्ला करण्याची योजना तयार करीत असल्याची माहिती आमच्या गुप्तचर यंत्रणेने दिली आहे, अशी भीती पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी आज शनिवारी व्यक्त केली आहे.
 
 
 
पाकिस्तानमधील बहुतांश आघाडीच्या प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त आज रविवारी प्रकाशित केले आहे. १४ फेब्रुवारीच्या  पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे घुसून मोठा हल्ला केला होता. यामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून, भारत आणखी एका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याची भीती यापूर्वी पंतप्रधान इम्रान  खान यांनीही बोलून दाखवली होती.
 
मुल्तान येथे आज पत्रपरिषदेत बोलताना कुरेशी म्हणाले की, भारत नव्या आणि तितक्याच घातक हल्ल्याची योजना तयार करीत असल्याची खात्रीलायक माहिती आम्हाला आमच्या गुप्तचर विभागाने दिली आहे. कदाचित, १६ ते २० एप्रिल या काळात हा हल्ला केला जाऊ शकतो.
 
हा हल्ला नक्की होणार आहे आणि भारत या हल्ल्याचे समर्थनही करणार आहे. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढविण्याचा भारताचा यामागील उद्देश असणार आहे, असा आरोपही त्यांनी केला.
 
असा हल्ला झाला, तर दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्यावर काय परिणाम होईल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता, असे सांगताना ते म्हणाले की, आम्ही आपली भीती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी देशांकडे व्यक्त केली आहे. भारताच्या बेजबाबदार वागण्याची जगाने दखल घ्यावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.