युवराजांची सैराट मुलाखत
   दिनांक :07-Apr-2019
एकतर कधी नव्हे ते महाराष्ट्रात येणार. त्यातही मर्‍हाटी मुलुखात येणार. या राज्याचा मंगलकलष आणल्याचा दावा करणार्‍या त्यांच्या घराण्याच्या ज्येष्ठ व्यक्ती पक्षीय कामानिमित्ताने अनेकदा येऊन गेलेल्या असल्याने त्यांना महाराष्ट्र काही नवखा नाही. महाराष्ट्र तसा यंग क्राऊड असलेला मराठी मुलूख आहे. मराठींना ना-राज कराल तर गाठ माझ्याशी आहे, असे व्यासपीठावर ठणकावणारे (अन्‌ नंतर दोन दिवस त्यामुळे त्यांचा घसा ठणकत राहतो, असे) नेते या मुलुखात आहेत. त्यांचा लंबक (साहेबांच्या मराठीत त्याला पेंडूलम असे म्हणतात) सारखा या टोकाचा त्या टोकाला जात असतो. गेल्या निवडणुकीत ते मराठी- गुज्जू भाई भाई म्हणत मोदींना िंसह म्हणत होते. आता एकदम त्यांची बारामती फिरली आहे म्हणा िंकवा मतीच बारामतीकडे फिरली आहे, असा एक अर्थपूर्ण अंदाज काढला जातो आहे. अर्थाचा अनर्थ अन्‌ पाण्याचा जो काय पदार्थ झाला असेल ते असो; पण मराठींचा कनवाळा असलेले हे नेते एकदम वन एटी डिग्रीत फिरले आहेत. त्यामुळे मराठी मुलुखही आता आपण नेऊ त्या दिशेने जाईल, म्हणून ते घराणेच राजवर्खी असलेल्या घराण्याचे युवराज महाराष्ट्रात नुकतेच येऊन गेले. वायनाड मध्ये चालल्या तशा फोडनाड इकडेही चालतात, हा आत्मविश्वास त्यांना. कारण सध्या ज्या पक्षाचा साधा ग्रामसेवकही नाही, असा पक्ष मराठींचा ताहणहार असू शकतो, त्यावरून हा अंदाज काढण्यात आला. त्यामुळे युवराज अत्यंत आत्मविश्वासाने (तसे ते अतिच आत्मविश्वासात असतात हल्ली) मराठी मुलुखात येऊन गेले. आता विदर्भात काही और बोलले. तिकडे पुण्यात गेल्यावर आणखीच काही वेगळंच बोलले.
 
 
 
विदर्भात उन्हं तापू लागली आहेत. तसंही विदर्भात याआधी दुसरं काही होतच नव्हतं. पारा वर चढायचा. गेल्या पाच वर्षांत विकासाचा तारा वर चढतो आहे. तरीही विदर्भात उन्हं तापतातच आणि मग नव्याने येणार्‍यांचे डोके थोडे फिरते. त्यामुळे येणारे विदर्भात काय वाट्टेल ते बोलून जातात. आता तर उन्हाने 43- 44 पर्यंत चढ गाठला आहे. त्यामुळे गरम मे क्या है? चे उत्तर विदर्भ, असेच देता येते. त्यात युवराज अन्‌ अवकाळी पाऊस एकाच वेळी आले नागपुरात. तरीही सभेला फार गर्दी नव्हती. (असे म्हणतात; पण काय आहे की ती इकडच्या नेत्यांची नालायकी ठरते. युवराजांचे काय आज आले नि आता कधी येतील, पण इकडचे नेते आपलेच असतात. त्यांना नालायक कसे ठरवायचे? राष्ट्रीय नेत्याच्या सभेलाही गर्दी जमवू शकले नाहीत! असा ठपका त्यांच्यावर नको म्हणून आपणही म्हणूया की पावसामुळे थोडी गर्दी कमी झाली.) वर्ध्याला मात्र गर्दी होती. आता गांधींचे गाव म्हणा की काय, त्यावरून युवराजांना गुरू आणि गांधीनगर हे दोन्ही आठवले. हे राम! यांना पुन्हा िंहदू संस्कृती आठवली. त्यात गुरूंना कसे स्थान असते, तो देवच कसा असतो, हेही आठवले आणि मग अडवाणी गुरू असताना त्यांना त्यांच्या शिष्याने ‘धक्के मार के स्टेज से उतार दिया था’ असा हृदयद्रावक किस्साही युवराजांनी सांगितला. आपल्या ज्येष्ठांचा, गुरूंचा कसा मान राखला पाहिजे, हे ते सांगत असताना त्यांच्या पक्षातले अडगळीतले अनेक ज्येष्ठ हे ऐकत होते आणि त्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला होता. अल निनोचा इफेक्ट होऊन त्याची वाफ झाली नाहीतर विदर्भात महापूर आला असता. कारण आकाशातून अर्जुनिंसगही हे ऐकत होते अन्‌ त्यांना त्यांच्या पक्षांत झालेली त्यांची समृद्ध अडगळ आठवली. आपण याच्या आजीच्या काळात उगाच पक्षात होतो, नातू युवराजाच्या काळात असतो तर आपला काय मान राहिला असता, असे त्यांना वाटले.
  
वर्ध्यावरून चंद्रपूर अन्‌ मग ते एकदम पुण्यातच गेले. आपल्या भाषणांचा जांगळबुत्ता काही जमत नाही अन्‌ लिहून दिलेली भाषणे किती द्यायची, असा प्रश्नच होता. बरे पुण्यात एकदम भाषण म्हणजे फारच. जिथे लोकमान्य टिळकांपासून तोफा कडाडल्या आहेत तिथे आपली खेळण्यातली पिस्तुल काय चालवावी, असा प्रश्न युवराजांना पडला की त्यांच्या प्रशांती किशोर बुद्धी असलेल्या सल्लागारालाच हा प्रश्न पडला देवजाणे; पण मग त्यावर तोडगा काढण्यात आला. युवराजांची सुबोध मुलाखतच आयोजित करण्यात आली. त्यात कॉलेजची मुले आणण्यात आली. एक बरे झाले की, युवराजाच्या पक्षातील नेत्यांनी सत्ताकाळात काही केले असो वा नसो; पण शाळा- कॉलेजची दुकानदारी सुरू केली आहे. खिरापतीच वाटण्यात आल्या त्या काळांत. त्यामुळे आपल्या नेत्यांच्या कार्यक्रमांना आयती पब्लिक मिळते. तीही मोफत. यातून दोन गोष्टी साध्य होतात. गर्दी होते. नेत्याची चापलुशीही पूर्ण होते अन्‌ मग या शैक्षणिक दुकानदारीचा विस्तारही साध्य होतो... तर युवराजांची ही प्रकट मुलाखत सुबोध प्रश्नांना दुर्बोध उत्तरे, अशीच झाली. म्हणजे प्रश्न ठरल्यानुसार मुलाखत देणार्‍याच्या बुद्धीला पेलवतील, असेच विचारण्यात येत होतो. म्हणून समोर सुबोध होता. उत्तरे मात्र कळतील की नकळतील, अशी येत होती. एका मुलीने प्रश्न विचारला, ‘इंजिनियरींग, मेडिकल झालेल्यांना अर्ध बेरोजगारीचा सामना का करावा लागतो?’ तर युवराज म्हणाले, ‘भारतमे बेरोजगारी की औसत क्या है और चीन मे क्या है?’ मग आपल्याच प्रश्नाचे आपणच उत्तर देत युवराज काय काय बोलत राहिले की प्रश्न विचारणारी ती विद्यार्थीनी मटकन्‌ खाली बसली. एका पूर्ण बेरोजगार (बेकार) नेत्याला आपण भलताच प्रश्न विचारला हे तिच्याच नव्हे तर सार्‍याच पुणेकर विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.
 
आता इकडे अडवाणींचा कनवाळा दाटून आला असताना तिकडे पुण्यात मात्र वातावरणातला काय बदल कळेना; पण त्यांनी एकदम मोदी मला आवडतात. ते माझा खूप राग करतात; पण मी त्यांच्यावर प्रेमच करतो. (कितीहा भारतीय संस्कृतीनुसार सुसंस्कृतपणा!) मी त्यांना शत्रू समजत नाही. पण, अचानक एकदम मुलामुलींनी मोदी, मोदी असा गलका केला. राहुल दचकले आणि बिचकलेही. मोदी प्रेमाचं भरतं असं पुणे- बारामती भागांतच का येतं कळत नाही. कदाचित हा पवार इफेक्ट असावा. कारण मोदीच म्हणाले होते की पवार हे माझे राजकीय गुरू आहेत आणि सध्या युवराजांनी पवारांची ट्युशन लावली आहे. अधून मधून पवार त्यांचे प्रगती पुस्तक जनतेला ऐकवित असतातच, ‘युवराज थोडे मॅच्युअर्ड झाले आहेत...’, तरीही एकदम पंतप्रधान होण्याइतके नाही.’असली प्रशस्ती पत्र पवार देत असतात. आपण ज्यांची शिकवणी लावली आहे आता, त्यांना गुरू माननात मोदी, याचा अर्थ ते आपले गुरुबंधू झाले, ही उपरती युवराजांना झाली असावी. मग भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अन्‌ मोदी तर माझे गुरूबांधव आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर प्रेमच करायला हवे, असे युवराजांना वाटले असावे. वाटले की कुटले, असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे वाटल्याबरोबर त्यांनी तेही बोलूनच टाकले. पुणेकरांनाही छान वाटले. बायोपिककार सुबोधला वाटले की आपण राहुल सारखे दिसतो तर त्याच्यावर एखादा बायोपिक करावा... तर राहुल म्हणाले की, मीच तुझ्या सारखा दिसतो म्हणून मीच तुझ्यावर बायोपिक करतो अन्‌ त्यात तुझा रोल करतो... हे खरेच आहे की युवराजांवर बायोपिक करावे असे काय आहे त्यांच्या आयुष्यात? पण त्यांना याचे यथार्थ भान आहे, हे पाहून मुलाखतीला आलेले पुणेकर भारावलीे!