बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडले
   दिनांक :07-Apr-2019
मुझफ्फरनगर:
 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.
 
 
काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत आखला होता. त्यानुसार बिर्याणीही दिली. पण बिर्याणी खाण्यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये अनेक समर्थक जखमी झाले. या प्रकरणी ३४ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (6 एप्रिल) माजी आमदार मौलाना जमील यांच्या घरी प्रचार सभा आयोजित केली होती. बिजनौर मतदारसंघातील काकरौली ठाण्याच्या हद्दीतील टडहेडा गावात ही सभा आयोजित करण्यात आली होती. प्रचार सभेनंतर दुपारी समर्थकांना जेवण ठेवण्यात आलं होतं. यामध्ये समर्थकांना बिर्याणी देण्यात येणार होती. पण बिर्याणी घेण्यावरून उपस्थित समर्थकांमध्ये हाणामारी झाली.
गावातील लोकांना हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळाने पुन्ही वाद झाला. दोन्ही गटांनी काठ्यांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. बिर्याणी कमी पडल्यामुळे हा वाद सुरू झाल्याची माहिती काही गावकऱ्यांनी दिली. या हाणामारीमध्ये अनेक समर्थक जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने हजर झाले. तसेच पोलिसांनी हस्तक्षेप करून समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.