भाजपाला आव्हान देण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही; पहिल्याच सभेत मायावतींचा हल्ला
   दिनांक :07-Apr-2019
देवबंद:
 भाजपाला आव्हान देण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही. या पक्षाने देशावर सर्वाधिक काळ सत्ता केली, पण चुकीची धोरणे राबवून सर्व काही गमावले आहे. फक्त बसपा आणि सपा आघाडीच भाजपाचा पराभव करू शकते. या निवडणुकीत हा प्रत्यय येणारच आहे, अशा शब्दात बसपा नेत्या मायावती यांनी कोंगरसोबत भाजपावरही हल्ला चढविला.
 
 
 
भाजपाने मागील पाच वर्षांच्या काळात तिरस्काराचे धोरण राबविले आहे. जनता आता या पक्षाला कधीच निवडून देणार नाही. भाजपाचा पराभव निश्चित आहे. लहान-मोठ्या कितीही चौकीदारांनी प्रयत्न केले, तरी भाजपा विजयी होणार नाही, असा दावा मायावती यांनी येथे आयोजित पहिल्याच निवडणूक सभेत केला. यावेळी व्यासपीठावर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित िंसह उपस्थित होते.
 
आमचे सरकार सत्तेत आल्यास, आम्ही कुणालाही किमान उत्पन्नाची हमी देणार नाही, त्याऐवजी आम्ही प्रत्येक गरीब कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देऊ, असे सांगताना त्या म्हणाल्या की, इंदिरा गांधी यांनीही गरिबी दूर करण्यासाठी २० सूत्री कार्यक्रम जाहीर केला होता, पण तो अंमलात आणला नव्हता. आम्ही शांत राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. इतर राजकीय पक्षांप्रमाणे गाजावाजा करीत नाही. काँग्रेसने ६० वर्षांच्या सत्ताकाळात अनेक मोठमोठी आश्वासने दिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ मिळाला होता, मग या पक्षाने ती आश्वासने का पूर्ण केली नाहीत.
 
भाजपावर हल्ला चढविताना मायावती म्हणाल्या की, भाजपा सरकारने नेहमीच शासकीय यंत्रणांचा आपल्या विरोधकांवर सूड उगविण्यासाठी वापर केला आहे. मागासवर्गीयांना या सरकारच्या काळात सर्वाधिक असुरक्षित वाटत आहे. भाजपाने अल्पसंख्यांविरोधात  तिरस्काराचे धोरण राबविले आहे. भाजपा यापुढे कधीच सत्तेत येणार नाही, यासाठी मुस्लिमांनी आपले मत फक्त सपा-बसपा आघाडीलाच द्यावे. आपले मत वाया जाणार नाही, याची काळजी मुस्लिमांनी घ्यावी.