पाकिस्तान होणार गरीब !
   दिनांक :07-Apr-2019
संयुक्त राष्ट्र :
 
दहशतवाद्यांनी पाकिस्तानला आपले घर बनवलेले असतानाच आर्थिक कोंडीनेही पाकिस्तानची अवस्था खूपच खराब झाली आहे. येत्या दोन वर्षांत पाकिस्तानचा विकासदर नेपाळ आणि मालदीव या लहान राष्ट्रांपेक्षाही कमी होणार आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्राच्या ‘इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड पॅसिफिक’ने (युएनइएससीएपी) आपल्या अहवालात काढला आहे.
 
 
या सर्वेक्षणानुसार, भारताचा विकासदर मात्र, ७.५ टक्के वेगाने वाढणार आहे. आशियाई विकास बँकेनेही (एडीबी) पाकिस्तानबाबत हेच मत व्यक्त केले होते, हे येथे उल्लेखनीय.
 
जीडीपीच्या क्षेत्रातही पाकिस्तान जगातील सर्वच देशांच्या तुलनेत मागे राहणार आहे. या वर्षी म्हणजे २०१९मध्ये पाकिस्तान केवळ ४.२ टक्के या वेगाने विकास करेल, तर २०२० मध्ये या देशाचा विकासदर केवळ ४ टक्के असेल. या दृष्टीने बघितले, तर येत्या काही वर्षांत पाकिस्तान हा नेपाळ आणि मालदीव या देशांच्या मागे राहणार आहे. कारण या दोन्ही देशांचा जीडीपी २०१९मध्ये ६.५ टक्के राहणार आहे. तर, बांगलादेशचा जीडीपी दर ७.३ टक्के असेल, असे या अहवालात म्हटले आहे.