पाकिस्तान पडला तोंडघशी; फ-१६च्या मोजणीबाबत ‘पेंटॅगॉन’चे कानावर हात
   दिनांक :07-Apr-2019
वॉशिंग्टन:
 एफ-१६ विमानांच्या मोजणीबाबत अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’ने याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. ‘पेंटॅगॉन’च्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान चांगलाच तोंडघशी पडला आहे.
 
 
 
पाकिस्तानची सर्व एफ-१६ विमाने सुरक्षित असल्याचा दावा ‘फॉरेन पॉलिसी’ या अमेरिकी मासिकाने केला होता. अमेरिकास्थित ‘फॉरेन पॉलिसी’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या सर्व एफ -१६ विमानांची मोजणी केली असून, या मोजणीत पाकिस्तानच्या ताफ्यातील सर्व एफ-१६ विमानांची संख्या ही पूर्वीइतकीच आहे, असे या मासिकाने म्हटले होते. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दोन सुरक्षा अधिकार्‍यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानने आपले कुठलेही विमान भारताने पाडले नसल्याचा बराच गवगवा केला होता.
 
मात्र, ‘पेंटॅगॉन’च्या निवेदनामुळे पाकिस्तानच्या दाव्यातील हवा निघाली आहे. भारतीय वायुदलाने ‘फॉरेन पॉलिसी’ मासिकाच्या दाव्याचे खंडन करताना विमानातील कॅमेरा आणि रडारचे पुरावे यांचाही दाखला दिला होता. भारतीय वायुदलाने 26 फेब‘ुवारीला पहाटे गुलाम काश्मीरमधील बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक केला. त्यानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी विमानांच्या तुकडीने भारतीय हद्दीत प्रवेश केला. त्यावेळी अभिनंदन यांनी आपल्या बायसन मिग-२१ विमानाने पाकच्या एफ-१६ विमानाचा पाठलागही केला. मिग-२१ मधून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने एफ-१६ विमानाचा वेध घेतला होता, असेही भारतीय वायुदलाने म्हटले होते.
 
दरम्यान, ‘पेंटॅगॉन’ने ‘फॉरेन पॉलिसी’ मासिकाच्या दाव्यापासून स्वत:ला तटस्थही ठेवले आहे. हा दोन देशांमधील मामला असून, विमानांच्या मोजणीचा अहवाल अशा पद्धतीने जाहीर करण्यात येत नाही, अशी भूमिका ‘पेंटॅगॉन’ने घेतली आहे. २७ फेब्रुवारीला  पाकिस्तानने त्यांचे एफ-१६ विमान गमावल्याप्रकरणी कुठली चौकशी करण्यात आल्याबाबतही आपल्याला ठाऊक नसल्याचे ‘पेंटॅगॉन’तर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
‘पेंटॅगॉन’च्या भूमिकेमुळे काही प्रश्नही आता निर्माण होऊ शकतात. पाकिस्तानने आपल्या मित्र राष्ट्रांपैकी कुठल्या देशाचे एफ-१६ विमान वापरले होते काय, ही शंका घेण्यासही जागा आहे. पाकिस्तान बरेचदा जॉर्डन, इजिप्त आणि तुर्कस्तान या देशांसोबत संयुक्तरीत्या हवाई युद्धाचा सराव करीत असतो, याकडे एका माजी भारतीय लढाऊ वैमानिकाने लक्ष वेधले आहे.