ममतांनी बंगाल गुंडांच्या हातात दिले: नरेंद्र मोदी
   दिनांक :07-Apr-2019
कूचबिहार:
तृणमूल काँग्रेसच्या  सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांनी बंगाल राज्य गुंड आणि माफियांच्या हवाली केले आहे. विकासाला विरोध असणार्‍या आणि विकासात नेहमीच अडथळे आणणार्‍या या ‘स्पीडब्रेकर  दीदी’ने अनेक केंद्रीय योजना बंगालमध्ये अंमलात आणण्यास ‘ब्रेक ’ लावला आहे. यामुळे देशातील इतर राज्यांमध्ये केंद्रीय योजनांचे जे फायदे मिळत आहेत, ते बंगालमधील जनतेला मिळू शकले नाही, असा स्पष्ट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे केला.
ममतांची मॉं-माटी-मानुषही घोषणा खोटी आहे. राजकीय फायद्यासाठी घुसखोरांना वाचवून त्यांनी मातीसोबत विश्वासघात केला आहे. बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या  गुंडांच्या हवाली करून त्यांनी जनतेच्या अपेक्षांचा भंग केला आणि सर्वांना अडचणीत टाकले आहे, असे पंतप्रधानांनी येथील रास मेला ग्राउंडवर  आयोजित विशाल जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले.
 
 
.
बंगालमध्ये भाजपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे ममता बॅनर्जी अस्वस्थ झाल्या आहेत. त्या खूप घाबरल्या असून, त्यांची झोप उडाली आहे. त्यांनी केंद्राच्या योजना रोखल्या नसत्या तर, आज अनेक योजनांचा तुम्हाला लाभ मिळाला असता. आता या दीदींना धडा शिकविण्यासाठी लोकसभा निवडणुका आल्या आहेत. तुम्ही केंद्रात आम्हाला बळकट केले, तर दीदींना झुकावेच लागेल आणि तुमच्यासाठी विकासकामे करावी लागतील. त्यांची मनमानी आता चालणार नाही, हे त्यांना समजले आहे, अशा शब्दात मोदी यांनी हल्ला चढविला.
 
 
 
ममतांचा खरा चेहरा समोर आणणे आवश्यक आहे. त्या बंगालची संस्कृती व येथील नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहेत, असा आरोप करताना, हा चौकीदार तुमच्या हिताच्या व देशवासीयांच्या रक्षणासाठी वचनबद्ध आहे. भ्रष्टचाऱ्याकडून  सर्व हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.