एकीकडे जर-तर, दुसरीकडे इतिहास!
   दिनांक :07-Apr-2019
परवा एका मोठ्ठ्या (म्हणजे प्रचंड) नेत्याचे भाषण झाले. कुठे झाले हे महत्त्वाचे नाही. झाले म्हणजे झाले! झाले गेले विसरून जा, या श्रेणीतले नव्हते बरे ते! वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी, त्यांच्या पद्धतीने त्याचा वृत्तांत दिला. कोणाच्या मते भाषण घणाघाती होते, तर आणखी कोणाच्या मते, ज्याची कातडी फाटली आहे अशा ढोलकीतून निघणार्‍या ‘संगीता’सारखे ते होते! काहींच्या मते भाषणाला अलोट गर्दी होती, तर काहींच्या निरीक्षणानुसार गर्दी फक्त स्टेजवरच झाली, मैदान बरेचसे रिकामे होते! कोणाला भाषण मुद्देसूद जाणवले, तर कोणाला त्यात केवळ विसंगती आढळली. आम्ही या वृत्तांतांची सरासरी काढली आणि त्याआधारे आमचे भाष्य तयार केले. ते चुकीचे असेल, तर त्याचा दोष वृत्त देणार्‍यावर!
 

 
 
राफेल व्यवहाराची आम्ही चौकशी करू, निवडणुकीचे निकाल लागू द्या! त्यानंतर करू! चौकशी कशी करू हे आज सांगणे इष्ट नाही! आधी हा निकाल लागू द्या, मग त्या प्रकरणाचा निकाल लावू, अशी गर्जना या नेत्याने केली असेल असा, बातमीच्या स्वरूपावरून आम्ही कयास केला! घणाघात कसा गर्जना देऊनच केला जातो! गडगडाट इथेच थांबला नाही, असे यासंबंधीच्या वृत्तांतांचा तपशील वाचल्यावर आमच्या लक्षात आले! चौकशी केल्यावर चौकीदाराला चौकीवरून हटवून कारागृहात, म्हणजे सोप्या भाषेत तुरुंगात टाकू असा दमही त्यांनी एका दमात दिला! याआधी 1975 मध्ये कॉंग्रेस कारकीर्दीत, चौकशी न करताच एकाच वेळी इजारो चौकीदारांना कैदेत टाकण्यात आले होते; तशी चूक यापुढे होणार नाही, असे बहुधा वक्त्याने स्पष्ट केले असावे! आमचा, राजकीय विश्लेषक असलेला मित्र म्हणाला, माणूस हुशार दिसतो; दिसतो तसा नसतो, अशी व्यर्थ मल्लिनाथी त्यावर कोणी करू नये! ‘निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर...’ अशी पूर्वअट आपल्या आश्वासनाला जोडतो; निकालाच्या अधीन राहून दिलेले हे आव्हान आहे! ते आक्रंदन आहे; रंजनाभिमुख आहे. ज्यांच्याजवळ सांगण्यासाठी विधायक कार्यक्रम नसतात, त्यांना काहीतं ऐकवावेच लागेल ना! त्याने कोट्यवधी रुपये अमक्याच्या खिशात टाकले (त्याचा खिसाही तेवढाच मोठा होता!); तमक्याला थोडासाही रव न होऊ देता (नीरव) पळविण्यात मदत केली; अशा कथांचे वाचन करावेच लागेल ना! आम्ही सोने वाटून सार्‍या गरिबांची चांदी करू; शेतकर्‍यांच्या घरात आयते पीक नेऊन देऊ; शेतीची मशागत करण्याचीही त्यांना गरज पडू देणार नाही. सारे सारे करू! िंजकू िंकवा मरू; पण त्यांना मात्र अमर करून सोडू! जागोजागी शेतकर्‍यांचे पुतळे उभारू! तिकडे उत्तर प्रदेशात तेथील नेतृत्वाने स्वत:ला स्टॅच्यु करवून घेतले, इकडे आम्ही बळीराजाला बळ देऊ! आत्महत्येची वेळ येणार नाही! पुतळे उभारूच उभारू! ब्रांझचे मजबूत पुतळे उभारून त्यांचा सन्मान करू!
नेत्याने आपल्या भाषणात पक्षाच्या जाहीरनाम्यातील वचनांचाही उल्लेख केला असणारच! याबाबात आम्ही मुळीच कंजूस नाही, हे त्यांनी आधी स्पष्ट केले असणारच! ‘वचने किम्‌ दरिद्रता’, हे आमचे ब्रीद आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेच असेल. ‘आम्ही सत्तेवर आलो तर’ या कंडिशनखाली आश्वासनांच्या पोस्टडेटेड चेक्सचे मुक्तहस्ताने वाटप करण्यात आले असेल!
थोडक्यात काय, की आश्वासनांची खैरात जर तर वर आधारित असल्याने आणि वचन देणारे सत्तेवर येण्याची तसूभरही शक्यता नसल्याने आपले नशीब आपणच उजळवावे, ते दुसर्‍याच्या हाती देऊ नये; आमिषाला बळी पडून स्वत:ची क्षमता ‘हूक’मध्ये अडकवून टांगणीला लावून घेऊ नये. नीरक्षीरविवेक शाबूत ठेवावा. स्वत:लाच बुलंद करावे!
आता ही दुसरी बातमी. पंतप्रधान मोदी यांना इतिहासच माहीत नाही, असे महाराष्ट्रातील एक जाणता नेता, कॉंग्रेसच्या ‘गौरवशाली’ इतिहासाचा दाखला देऊन म्हणाला. जाणतेपणे म्हणाला! हे मात्र शंभर टक्के बरोबर आहे. मोदींना हे माहीतच नाही, की या देशाची वाटणी कोणी केली? या देशाचा मोठा भूभाग चीनच्या कब्ज्यात कोणी जाऊ दिला? काश्मीरचा अर्धाअधिक हिस्सा पाकिस्तानला कोणी व्याप्त करू दिला? 1984 मध्ये शिखांची कत्तल झाली तेव्हा कोणाचे सरकार होते? घटनेची पायमल्ली करणारी एकोणचाळीसावी घटनादुरुस्ती कोणी केली? सीताराम केसरी यांची अपमानजनक पदच्युती कोणी केली? परकीय व्यक्तीच्या मुद्यावर तिघा नेत्यांना पक्षातून कोणी काढून टाकले? (त्यापैकी एक नेता एवढ्यातच त्याच कॉंग्रेसमध्ये गेला, तर हा दुसरा त्याच कॉंग्रेसचा शेला धरून चालत आहे!) परकीय व्यक्ती मात्र जागच्या जागीच आहे! मोदींचे सर्वात मोठे अज्ञान हे, की संविधानाला गुंडाळून या देशावर आणिबाणी कोणी आणली आणि देशातील हजारो लोकांना सुमारे 21 महिने तुरुंगात कोणी डांबले, हे त्यांना माहीतच नाही! मोदींनी हा इतिहास जाणून घ्यावा! आवश्यकता पडल्यास जाणत्या नेत्याकडून जाणून घ्यावा! कॉंग्रेसचेच सरकार कॉंग्रेसचेच निष्ठावान कसे पाडतात, याचाही इतिहास ते सांगतील! लाजलज्जा किती महत्त्वाची असते, याचाही पाठ देतील! तेव्हा मोदींनी वेळ काढून हे सारे समजून घ्यावे! आपल्या भाषणांतून त्या इतिहासाची उजळणी करावी! कोणी लाजणार नाही, तरीही!
र. श्री. फडनाईक