वर्षव अमृत धारा!
   दिनांक :07-Apr-2019
ढगाळलेलं आकाश! मधूनच विजेचा कडकडाट! रमाच्या मनाची स्थितीही तशीच! मॅट्रीकच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले तरी घरी जाताच आपल्या लग्नाचा विषय निघणार! मैत्रिणीसोबत ‘वहिनीच्या बांगड्या’ हा पिक्चर पाहिलेला त्याचा मनावर जबरदस्त पगडा पडलेला! किती छान छोटा दीर, त्याची वहिनी! आपल्याला छोटा दीर हवाच!
रात्री जेवणानंतर सगळे गप्पा करायला बसले. एकच विषय रमासाठी डॉक्टर नवरा बघायचा का वकील की छान श्रीमंत? सगळे हसून म्हणाले- ‘‘रमाला विचारा ना!’’ विचारात असलेली रमा खाड्‌कन भानावर आली. म्हणाली- ‘‘नवरा तुमच्या मनानी शोधा, पण त्याला छोटा भाऊ हवा!’’ हे ऐकून एकदम हास्याचा गडगडाट झाला; काय पण विचार! तिचं कोण ऐकणार! येणार्‍या मुलाला तुला छोटा भाऊ आहे का? असं थोडंच विचारणार!
झालं वर परीक्षा झाली. डॉक्टर नवरा राज निवडण्यात आला. नेमक्या सोयरिकेच्या वेळी एक छोटा मुलगा येऊन राज जवळ बसला. राज म्हणाला- ‘‘हा माझा छोटा भाऊ, खूप हुशार आहे. खेळात, अभ्यासात, सगळ्या गोष्टीत पुढे! रमाने प्रेमाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला, मनोमन देवाला हात जोडले. ‘‘जगात देव नक्कीच आहे, देवा तुझे किती आभार मानू?’’ म्हणाली.
वळवाचा पाऊस पडावा अचानक, मातीचा सुगंध पसरावा तसं तिला वाटलं, नवरा मुलगा डॉक्टर, देखणा व स्मार्ट, त्याच्याजवळ बसलेला त्याचा भाऊ तृप्त नजरेने तिच्याकडे बघत होता. मनात म्हणत होता वहिनी म्हणून मला ही पसंत आहे. रमानी बाजूला नजर फिरवली. तिच्या कुटुंबातले सगळे खूष होते.
लग्न ठरलं, रमा खूष! या छोट्या दिराचं नाव होतं भास्कर! नावाप्रमाणे तेजस्वी, हुशार, सगळ्या घरात, शाळेत, नातेवाईकात त्याचं कौतुक! रमा त्याच्याकडे मोठ्या कौतुकानं बघायची.
नवी भास्करची वहिनी छान स्वयंपाक करायची. सकाळी उठून सडा घालून रांगोळी काढायची अन्‌ रात्री भजन व भावगीत पण म्हणायची सगळे खूष! मॅट्रीकच्या परीक्षेत मेरीटमध्ये आली. सगळ्यांच्या तोंडी तिचं कौतुक! तिची शालिनता, हुशारी, गोड गळा, हाताला चव! आता भास्करच कौतुक कमी झालं अन्‌ निवच वाढलं!
भास्कर भयानक चिडला, ही नव आलेली वहिनी सारे तिचं कौतुक करणारं! वैतागला एकदम! तिचा द्वेष करायला लागला. तिच्या चुका काढायला लागला. एकदा तर चक्क तिच्या सोन्याच्या बांगड्या अंगणात सापडल्या म्हणून खोटं बोलून आईजवळ दिल्या. आईला माहीत होतं, ती असं करणार नाही. वहिनी भाजी निवडत होती. त्यानं थोड्यावेळात भाजीच्या गंजात मूठभर मीठ टाकलं. सगळे म्हणाले- ‘‘एवढी भाजी खारट?’’ भास्कर म्हणाला- ‘‘वहिनीनी केलीना!’’ आई म्हणाली- ‘‘तिनं निवडली मी केली, पडलं असेल मीठ माझ्या हातून’’
दोन दिवसांनी भास्कर व राज दोघांनाही ताप आला. रमा रात्रभर भास्करजवळ बसून डोक्यावर थंड पाण्याचया पट्ट्या ठेवत होती, औषध देत होती झोपली पण नाही. सकाळी भास्कर म्हणाला- ‘‘वहिनी तू दादाजवळ का नाही बसली ? त्याला पण ताप आहे, झोपलीपण नाही.’’ रमा म्हणाली- ‘‘अरे ते डॉक्टर आहेत, मोठे आहेत. तुला उद्या फी भरायची आहे, मला लग्नात मिळालेले आहेत 4000/- रु. तू फी भर, पुस्तक घे!’’ ताप कमी झाला होता. रमाच्या डोळ्यातून अश्रू भास्करच्या डोक्यावर पडू लागले. भास्करच्या डोळ्यातही पश्चातापाचे अश्रू दाटून आले. भास्कर म्हणाला- ‘‘वहिनी या अमृताच्या धारा अशाच वर्षू दे! माझ्या मनातील तुझ्या विषयीचा राग धुवून टाकू दे!’’
रमा मनात म्हणाली- ‘‘सुख आले माझ्या दारी, काय उणे या संसारी!’’
शांता यमसनवार
9890666165