कोण हा वाड्रा?
   दिनांक :07-Apr-2019
कॉंग्रेसच्या राणीमांचे जावई, राजपुत्राचे मेव्हणे, राजकन्येचे पती दामाद-ए-हिन्द रॉबर्ट वाड्रा अखेर राजकारणात नाक खुपसते झाले! लालकृष्ण अडवाणी यांना तिकीट नाकारून भाजपाने चांगले नाही केले. ज्येष्ठ मार्गदर्शकाचा मानसन्मान राखायलाच हवा, असा न मागितलेला सल्ला त्यांनी भाजपाला देऊन टाकला. याबद्दल भाजपाच्या तमाम ज्येष्ठश्रेष्ठ नेत्यांनी जावईबापूंचे जाहीर आभार मानले पाहिजे. गेली सहा दशकं पक्ष चालवूनही त्यांना जे कळले नाही, ते वाड्रा नावाच्या नव्या पोराने त्यांना सांगितले; नव्हे सुनावले!
 

 
 
वाड्राच्या म्हणण्याप्रमाणे अडवाणींचे ज्येष्ठत्व वेगळे तपासण्याची काही गरज नाही. जनसंघाच्या स्थापनेपासून गेल्या पाच तपांहून अधिक काळ ते या पक्षात आहेत आणि सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या योगदानाचा आणि ज्येष्ठतेचा पक्षाने वेळोवेळी योग्य सन्मान केला. वर्षानुवर्षे (सुमारे पन्नास वर्षे!) खासदार बनवून उपपंतप्रधानपदापर्यंत नेले. पंतप्रधान बनण्याची संधीही दिली; ती फळली नाही हा भाग वेगळा! आज त्यांचे वय ब्याण्णव वर्षांचे आहे. म्हणजे सेवानिवृत्तीच्याही पलीकडचे! त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट दिले नाही यात अनैसर्गिक असे काही नाही. परंतु, ज्यांच्या डोक्यात मोदीद्वेष ठासून भरला आहे त्यांना विषय मिळाला आणि अचानक कधी नव्हे ते अडवाणींचा उमाळा येऊ लागला! त्या यादीत वाड्रानेही स्वत:चे नाव दर्ज करून घेतले आहे.
ज्येष्ठांची एवढी काळजी असलेल्या वाड्राला त्यांच्या घरात (म्हणजे सासरी) काय सुरू आहे, याची कल्पना यावी म्हणून फक्त दोन घटना येथे नोंदवत आहे. त्यासंदर्भात वाड्रा कधी काही बोलल्याचे आठवत नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण... हीच जगाची रीत आहे ना!
कॉंग्रेसचे पहिले नेहरू-गांधी कुटुंबबाह्य पूर्णवेळ पंतप्रधान आणि कॉंग्रेसाध्यक्ष पी. व्ही. नरिंसह राव असताना सोनिया गांधी पक्षात नव्हत्या. सीताराम केसरी पक्षाध्यक्ष झाल्यावर 1997 मध्ये चापलुसांनी सोनियांना गळ घालून अध्यक्ष बनविले आणि केसरीचाचांना पद सोडायला सांगितले. ते तयार नव्हते. शेवटी त्यांना एका खोलीत कोंडून सोनियांनी पक्षाध्यक्षपदाचा चार्ज एकतर्फी घेतला आणि केसरींना सामानासकट कार्यालयाबाहेर काढले. ना खाता ना बही, केसरीचाचा कहे वो सही... अशी ज्यांची ख्याती कॉंग्रेसमध्ये अनेक वर्षे कोषाध्यक्ष म्हणून होती, त्यांच्या या अध्यक्षपदाचा असा सन्मान झाला वयाच्या ब्यांशिव्या वर्षी! तो वाड्राच्याच सासूबाईने केला.
नरिंसहराव यांचे प्रकरण तर आणखी संतापजनक आहे. पंतप्रधान असताना ते सोनियांना भाव देत नसत. याचा राग त्यांच्या मनात होता आणि त्याचे उट्टे त्यांनी नरिंसहरावांच्या मरणोत्तर फेडले! नरिंसहरावांचा अंत्यविधी त्यांनी दिल्लीत होऊ दिला नाही. पार्थिव हैदराबादला नेताना कॉंग्रेस कार्यालयाच्या आत येऊ न देता प्रवेशद्वाराजवळील फूटपाथवर ठेवायला लावले! (शेम... शेम...) स्वत:च्याच पक्षाच्या माजी अध्यक्षाचा आणि देशाच्या माजी पंतप्रधानांचा (वय वर्षे चौर्र्‍यांशी) असा सन्मान!
आपल्या घरात काय जळते ते आधी पाहावे माणसाने आणि मग इतरांना ज्ञान पाजावे! जावयाने तर सावधच राहावे. सासरकडचे केव्हा गोत्यात आणतील, सांगता नाही येत! स्वत: नीट वागायला शिका आणि मग लोकांना फुकटचे सल्ले द्या, जावईबापू!!
विनोद देशमुख
9850587622