उद्या आयकर विभाग माझ्याही घरावर छापा मारेल
   दिनांक :08-Apr-2019
- धाबे दणाणलेल्या पी. चिदम्बरम्‌ यांंचे ट्विट
नवी दिल्ली,
आयकर विभाग आपल्या घरावर छापा मारणार आहे, असा दावा धाबे दणाणलेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम्‌ यांनी केला आहे. निवडणुकीतील प्रचारातून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारच्या सांगण्यावरून ही कारवाई होत असल्याचा कांगावाही त्यांनी केला आहे.
 
 
 
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या दोन निकवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने रविवारी छापे टाकत तब्बल 9 कोटी रुपये जप्त केले. या कारवाईनंतर पी. चिदम्बरम्‌ यांनी ट्विट करत आपल्या घरावरही आयकर विभाग छापा मारणार असल्याची माहिती दिली. माझ्या शिवगंगा येथील घरावर आयकर विभाग छापा मारणार आहे. आम्ही सर्च पार्टीचे स्वागत करतो. लपवण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही हे आयकर विभागाला माहीत आहे. याआधीही आयकर आणि इतर संस्थांनी माझ्या घराची झडती घेतली आहे आणि त्यात काहीच मिळाले नव्हते. मात्र, केवळ निवडणुकीतील प्रचारातून लक्ष विचलित करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
 
लोक या सरकारचा अत्याचार पाहत आहेत आणि निवडणुकीत त्यांना चांगला धडा शिकवतील, असेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनीही सरकारच्या या कारवाईवर निशाणा साधला आहे. विरोधकांना निष्प्रभ करण्याचे मोदींचे नवे अस्त्र, आयकर खाते! लवकरच महाराष्ट्रातही! देशभरात सुरू असलेले आयकर छापे विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी होत असल्याचा आरोप होत आहे.
 
मध्यप्रदेशात आयकर विभागाने मुख्यमंत्री कमलनाथ यांचे दोन निकवर्तीय राजेंद्र मिगलानी आणि प्रवीण कक्कड यांच्या घरावर छापे टाकत तब्बल 9 कोटी रुपये जप्त केले. प्रवीण कक्कड हे कमलनाथ यांचे सचिव आहेत. राजधानी दिल्ली आणि मध्यप्रदेशात भोपाळ आणि इंदूरसह देशभरात 6 ठिकाणी छापे टाकण्यात आले. स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. स्थानिक पोलिस आम्हाला काम करू देत नसल्याचा आरोप सीआरपीएफने केला आहे.