कलम 35-ए रद्द करणारच- अरुण जेटली यांचा निर्धार
   दिनांक :08-Apr-2019
नवी दिल्ली,
भाजपाच्या संकल्पपत्रात राष्ट्रवादाचा मजबूत सिद्धांत आहे, ते कोणत्या तुकडे-तुकडे गँगने तयार केलेले नाही, असा जोरदार पलटवार करताना, जम्मू-काश्मिरातील नागरिकांना संपत्तीबाबत विशेषाधिकार देणारे कलम 35-ए रद्द कण्याचा निर्धार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सोमवारी व्यक्त केला. हे संकल्पपत्र एक वास्तव आहे, त्यात देशाप्रती निर्धार आहे, असे जेटली यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे संकल्पपत्र जाहीर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
 

 
 
भाजपा सरकारच्या नव्या धोरणांना, दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्याच्या नव्या सिद्धांतांना जगाने मान्यता दिली आहे, असे जेटली यांनी सांगितले. राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आलेले कलम 35-ए जम्मू-काश्मिरातील कायम अधिवास नसलेल्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे, त्यामुळे ते रद्द करण्याचा आमचा निर्धार पक्का आहे, असे ते म्हणाले. आर्थिक महासत्ता आणि एक मजबूत देश म्हणून भारताची वाटचाल अतिशय गतीने सुरू असताना, आपल्याला देशाला कमजोर करणारे सरकार हवे की मजबूत सरकार हवे, हा निर्णय घेण्याची वेळ आता आलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.