एका पत्रकाराच्या हत्येने हादरलेेला ‘प्रिन्स!’
   दिनांक :08-Apr-2019
दिल्ली दिनांक 
 
रवींद्र दाणी  
 
 
सहा महिन्यांपूर्वी टर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये जमाल खशोगी या पत्रकाराची हत्या करण्यात आल्यानंतर प्रकरण संपले असे वाटत असताना, हे हत्याकांड सौदी अरेबियाचे ‘क्राऊन प्रिन्स’ म्हणजे मोहम्मद बिन सलमानसाठी या भावी शासकासाठी गळफास ठरत आहे.
जमाल खशोगी हा मूळचा सौदी अरेबियाचा एक पत्रकार. वॉिंशग्टन पोस्टसाठी तो लिखाण करीत असे. त्याच्या लिखाणावर सौदी प्रिन्स सलमान नाराज होता. जमालने सौदी शासकांविरोधात आघाडी उघडली होती. त्या नाराजीतून जमालची हत्या झाली. एखाद्या कुख्यात अतिरेक्यास संपविण्यासाठी जशी योजना तयार केली जाते, तशी योजना जमालला ठार करण्यासाठी आखण्यात आली. जेणेकरून त्याचे हत्याकांड उघडकीस येऊ नये.
 
 

 
 
 
16 मारेकरी
 खशोगी हा पन्नाशी उलटलेला होता. त्याला दोन मुले, दोन मुली होत्या. मात्र, दुसर्‍या विवाहासाठी त्याला काही कागदपत्रे हवी होती. ती मिळविण्यासाठी तो इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात गेला. त्याला पुन्हा आठ दिवसांनी येण्यास सांगण्यात आले आणि या काळात जमालच्या हत्येचे कास्थान सौदी अरेबियात रचण्यात आले. जमालला ज्या दिवशी कागदपत्रांसाठी दूतावासात बोलविण्यात आले होते, त्याच्या एक दिवस अगोदर 16 मारेकर्‍यांची एक चमू वेगवेगळ्या देशांतून इस्तंबूलमध्ये दाखल झाली. यात काही माजी सुरक्षा अधिकारी होते आणि जमालसारखा दिसणारा एक इसम होता. जमाल नियोजित वेळी सौदी दूतावासात शिरला. सोबत त्याची नियोजित पत्नी होती. तिला दूतावासात प्रवेश नसल्याने ती बाहरेच थांबली होती. जमाल दूतावासात तर गेला, बाहेर मात्र कधीच आला नाही. दूतावासात दाखल झालेल्या मारेकर्‍यांनी जमालची हत्या केली. नंतर त्याचे कपडे काढले गेले. ते जमालसारख्या दिसणार्‍या एका सौदी नागरिकास घालावयास लावले गेले. मात्र, जमालचे बूट या इसमास होत नव्हते. तो आपलेच बूट घालून दूतावासाच्या बाहेर पडला. या घटनेने जमालच्या हत्याकांडाचे प्रकरण उघडकीस आणले. जमाल दूतावासात शिरला व बाहेरही पडला, हे जगाला दाखविण्यासाठी त्याच्यासारख्या दिसणार्‍या एका व्यक्तीस मुद्धाम इस्तंबूलला आणून, त्याला जमालचे कपडे घालण्यात आले होते. पण, कपडे जमालचे व बूट त्या इसमाचे, याने हे प्रकरण उघडकीस आणले.
 
इलेक्ट्रिक कटरचा वापर
सौदी दूतावासात जमालची हत्या झाल्यावर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, याची योजना अगोदरच ठरलेली होती. सौदी अरेबियातून आलेल्या चमूने आपल्यासोबत एक इलेक्ट्रिक कटर आणले होते. या कटरने जमालच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. काही तुकडे बॅगेत भरून ते बाहेर नेण्यात आले, तर काही दूतावासाच्या आवारात असलेल्या विहिरीत फेकण्यात आले. जमालचे हत्याकांड उघडकीस येताच चौकशीची मागणी सुुरू झाली. सौदी अरेबियाने चौकशीची मागणी लगेच मान्य केली. एक चौकशी पथक इस्तंबूलला रवाना करण्यात आले. या पथकाने हत्याकांडाची चौकशी करण्याऐवजी सारे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वापर करण्यात आला. जमालच्या शरीराचे तुकडे या ॲसिडमध्ये टाकून ते विरघळविण्यात आले. मात्र, ही बाबही टर्की पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघडकीस आली. जमालची हत्या झाली आणि या हत्येत सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानचा हात होता, ही बाब सीआयएने केलेल्या चौकशीत उघड झाली.
 
गुप्त ऑडियो कॅमेरा
जमालच्या हत्याकांडातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, दूतावासात जमालची हत्या, त्याच्या शरीराचे तुकडे करण्याचे काम सुरू असताना, एक ऑडियो कॅमेरा हे सारे ऐकत होता. हे कसे झाले, हे मात्र अद्याप उघड झालेले नाही. जमालची हत्या होत असताना, त्याच्या वेदना, त्याच्या शरीराचे तुकडे केले जात असताना, इलेक्ट्रिक कटरचा आवाज, या सार्‍या बाबी या ऑडियो टेपमध्ये आहेत. मात्र, टर्कीतील प्रसारमाध्यमांनी परिपक्वता दाखवीत त्या जाहीर केलेल्या नाहीत. अमेरिकेच्या सीआयए प्रमुखांनी मात्र ही टेप ऐकल्याचे म्हटले जाते. ही ऑडियो टेप अंगावर शहारे आणणारी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नंतर नोंदविली. विशेष म्हणजे ज्या ‘तज्ज्ञाने’ इलेक्ट्रिक कटर हाती घेत जमालच्या शरीराचे तुकडे केले, तो कानाला संगीत ऐकणारे यंत्र लावून हे काम करीत होता. जमालच्या हत्येनंतर हे अधिकारी वेगवेगळ्या विमानांनी इस्तंबूलच्या बाहेर पडले.
 
ट्रम्प तटस्थ?
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या हत्याकांडाच्या विरोधात ठाम भूमिका घ्यावी, असा प्रयत्न काही अमेरिकन सिनेटर करीत असले, तरी अद्याप ट्रम्प यांनी तसे केलेले नाही. यावर ट्रम्प यांची प्रतिक्रिया फार मार्मिक होती. या हत्याकांडात क्राऊन प्रिन्सचा हात असावा काय? ट्रम्प यांचे उत्तर होते- असूही शकतो, नसूही शकतो. काही युरोपियन देशांनी मात्र जमालच्या हत्याकांडाच्या विरोधात सौदी अरेबियाला होणारा शस्त्रपुरवठा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. जमाल हत्याकांडाची चौकशी पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी 32 देशांनी केली आहे.
 
जागतिक दबाव
जमाल हत्याकांड प्रकरण गंभीर झाले असल्याची कल्पना सौदी अरेबियास आली असल्याने त्यानेही याची सारवासारव सुरू केली. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे जमालच्या चारही मुलांना सौदी अरेबियात घर देण्यात आले असून, चौघांनाही दरमहा मोठी रक्कम दिली जात आहे. जमालच्या मुलांनी अद्याप या हत्याकांडाबाबत आपली भूमिका नोंदविलेली नाही. जमालची मुले सौदी अरेबियात राहात असल्याने त्यांनी मौन पाळले असल्याचे म्हटले जाते. जमाल हत्याकांडाच्या चौकशीसाठीचा वाढता जागितक दबाव लक्षात आल्यावर, सौदी अरेबियाने जमालच्या हत्याकांडासाठी पाठविण्यात आलेल्या मारेकरी पथकातील अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाचे शासक, प्रकरण थंड करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असतानाच, काही देशांनी मात्र जमाल हत्याकांड प्रकरण वेगवेगळ्या व्यासपीठांवर उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अमेरिका तटस्थ असल्याने यात फार काही होईल असे मानले जात नाही. सौदी अरेबिया हा दुसर्‍या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. सर्वाधिक तेल उत्पादन करणार्‍या वेनेझुएलाशी अमेरिकेचे संबध ताणले गेले आहेत. त्यामुळे सौदी अरेबियाला फार नाराज करण्याच्या मन:स्थितीत अमेरिका नसल्याचे म्हटले जाते.