यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा
   दिनांक :08-Apr-2019
 
यवतमाळ : जिल्ह्याला सलग दुसर्‍या दिवशीही वादळी पावसाने झोडपून काढले. यवतमाळसह मारेगाव, पुसद, उमरखेड तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास वादळासह पाऊस कोसळला. मुळावा, मारेगाव येथे काही ठिकाणी बोराएवढ्या गारा पडल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळली. वादळी पाऊस व गारपिटीमुळे रबीतील गहू व हरभरा पिकाचे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी अद्यापही शेतात ठेवलेला गहू व हरभरा ओला झाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 
 
 उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे गुरुवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह अर्धातास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा बर्‍याच शेतकर्‍यांनी गहू आणि हरभरा पेरला. या पिकांसह हळद काढणीचेही काम चालू आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी एकरी दहा हजार रुपयेप्रमाणे गुत्ता देवून मजूरांकडून हळद काढणीचे काम सुरु केले आहे. मात्र अचानक आलेल्या पावसाने हळदीचे ढिग भिजून मोठे नुकसान झाले. गेले दोन दिवस परिसरात प्रचंड ऊन तापल्यामुळे शेतकरी बेसावध होते. त्यामुळे गुरुवारच्या पावसात मोठे नुकसान झाले.