भारत हल्ल्याच्या तयारीत; पाकिस्तानचा कांगावा
   दिनांक :08-Apr-2019

इस्लामाबाद,

'भारत १६ ते २० एप्रिल या काळामध्ये आणखी एक हल्ला करण्याचा विचार करीत आहे,' असा नवा कांगावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी रविवारी केला. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने धडक कारवाई करत, २६ फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तेव्हापासून पाकिस्तानकडून सातत्याने भारताविरोधात खोटा प्रचार करण्यात येत आहे. याच्याच पार्श्वभूमीवर, कुरेशी यांनी मुलतान येथे पत्रकार परिषदेमध्ये नवा कांगावा केला आहे.

 

 
 

कुरेशी म्हणाले, 'भारत पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तयारी करीत आहे, अशी विश्वसनीय माहिती आम्हाला मिळाली आहे. भारताकडून तयारी करण्यात येत असून, या माहितीनुसार १६ ते २० एप्रिल रोजी हा हल्ला होऊ शकतो. हा हल्ला झाला, तर त्याचा परिणाम विभागातील शांतता आणि स्थैर्यावर होणार आहे. पाकिस्तानवरील राजनैतिक दबाव वाढविणे, यासाठीही भारताचा प्रयत्न आहे.' याविषयी सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यांना माहिती दिली असून, भारताच्या बेजबाबदार वर्तनाविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष द्यावे आणि त्यांना रोखावे, अशी पावले पाकिस्तानने उचलली आहेत, असेही त्यांनी सांगितले.