भारतीय डॉक्टर यूकेमध्ये बेपत्ता
   दिनांक :08-Apr-2019
लंडन,
यूकेस्थित भारतीय डॉक्टर बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ४२ वर्षांच्या उमा कुलकर्णी गेल्या चार-दिवसांपासून पश्चिम इंग्लंडमधून बेपत्ता आहेत. 

 
 
हेरफोर्डशायर भागात राहणाऱ्या कुलकर्णी ब्रिस्टलला जाण्यासाठी निघाल्या असाव्यात, असा अंदाज स्थानिक पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्याची माहिती 'हिंदुस्थान टाइम्स'ने दिली आहे. 'पाच फूट उंच आशियाई वंशाची महिला, सडपातळ बांधा, काळे केस, दोन्ही कान टोचलेले' असं उमा कुलकर्णी यांचं वर्णन ॲवॉन आणि समरसेट पोलिसांनी वेबसाईटवर केलं आहे.
 
3 एप्रिलपासून कुलकर्णींचा ठावठिकाणा लागलेला नाही, मात्र त्यांची ब्राँझ रंगाची गाडी सेवर्न ब्रिज क्रॉसिंग भागात आढळली. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना त्यांच्याविषयी माहिती मिळवल्यास कळवण्याचं आवाहन केलं आहे.
उमा कुलकर्णी यांनी 1999 साली नागपूर विद्यापीठातून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये आहे. यूकेमध्ये 2015 साली त्यांनी डॉक्टरकीची प्रॅक्टिस करण्यासाठी नोंदणी केली होती.