घोषणा पत्र नव्हे, आमचा संकल्प : सुषमा स्वराज
   दिनांक :08-Apr-2019
नवी दिल्ली,
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज जे जारी केले, ते इतर राजकीय पक्षांप्रमाणे घोषणापत्र नसून, संकल्पपत्र आहे. इतर पक्ष निवडणुका आल्या की, जाहीरनामे िंकवा घोषणापत्र प्रसिद्ध करीत असतात, पण भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे, जो संकल्पपत्र जाहीर करीत असतो, असे केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.
 
 
 
आमच्या संकल्पपत्रात जे मुद्दे आहेत, ते केवळ घोषणा म्हणून समाविष्ट करण्यात आलेले नाहीत, नागरिकांना त्यातून लाभ मिळावा, यासाठी त्यात भाजपाचा ठाम निर्धार आहे. 2014 मधील संकल्पपत्रातील प्रत्येक वचनाची भाजपाने पूर्तता केलेली आहे. नव्या कारकिर्दीत अंमलबजावणी करण्यासाठी आमच्या सरकारने एकही वचन शिल्लक ठेवले नाही. त्याचप्रमाणे या नव्या संकल्पपत्रातील प्रत्येक संकल्प आम्ही याच कार्यकाळात पूर्ण करणार आहोत, असे स्वराज यांनी विश्वासाने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांना गेल्या पाच वर्षांच्या काळात पाच जागतिक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात सौदी अरबचाही समावेश आहे. मोदी यांच्या नेतृत्वात भारताने जगात नवी उंची गाठली आहे. इस्लामिक सहकार्य संघटनेच्या परिषदेत जेव्हा भारताला सन्मानाचे निमंत्रण आले होते, त्यावेळी पाकिस्तानने या परिषदेवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती, पण इस्लामिक परिषदेतील 57 पैकी 56 देशांनी पाकिस्तानच्या धमकीला न जुमानता भारताला सन्मानित केले होते.