मिरवाईज अखेर झुकला, एनआयएपुढे हजर - अनेक तास कसून चौकशी
   दिनांक :08-Apr-2019
नवी दिल्ली,
दिल्लीत माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे एनआयएने माझ्या घरीच येऊन माझी चौकशी करावी, अशी टाळाटाळ करणारा फुटीरतावादी नेता मिरवाईज उमर फारूख आज सोमवारी मुकाट्याने राष्ट्रीय तपास संस्था अर्थात्‌ एनआयएच्या दिल्लीतील मुख्यालयात हजर झाला.
 
 
 
काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानकडून मिळणार्‍या निधीप्रकरणी चौकशी करण्यासाठी एनआयएने मिरवाईजला तीन वेळा समन्स बजावला होता, पण त्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून वारंवार टाळाटाळ केली होती.
त्यानंतर एनआयएने त्याला निर्वाणिचा इशारा देणारा समन्स गेल्या आठवड्यात जारी केला होता. सोबतच त्याला सुरक्षेची हमीही देण्यात आली होती. त्यानुसार तो आज सकाळी श्रीनगरहून दिल्लीत आला. या प्रवासात त्याला आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात आली होती. मिरवाईजसोबत अब्दुल गनी भट, बिलाल लोन आणि मौलाना अब्बास अन्सारी हे फुटीरतावादी नेतेही आले.
 
 
 
काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानातून हवालामार्गे येणारा निधी सर्वप्रथम कुठे जातो आणि तिथून तो कोणकोणत्या लोकांच्या माध्यमातून फुटीरतावादी नेत्यांना प्राप्त होतो, यासह आतापर्यंत किती निधी मिळाला आहे, आदी प्रश्न एनआयएच्या अधिकार्‍यांनी मिरवाईजला विचारले.
दरम्यान, दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी रविवारी रात्री उशिरापर्यंत मिरवाईजच्या घरी फुटीरतावादी नेत्यांची बैठक सुरू होती. समन्स जारी करण्याच्या एनआयएच्या निर्णयाचा या बैठकीत निषेधही करण्यात आला. फुटीरतावादी नेत्यांना केंद्र सरकार मुद्दाम त्रास देत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.