अब्दुल सत्तारांचं बंड झाले थंड!
   दिनांक :08-Apr-2019
 
 
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. तसंच त्यानंतर त्यांनी आपण अपक्ष लढणार असल्याचंही जाहीर केलं होतं. पण आता अब्दुल सत्तार यांचं बंड शांत झालं असून ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये घरवापसी करतील, अशी माहिती आहे.
अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती. पण त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्तार यांनी गिरीश महाजनांसह थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर अब्दुल सत्तारही आता भाजपच्या गोटात दाखल होणार का, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली होती.
 

 
 
वास्तविक सत्तार हे कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण जागावाटपावेळी चव्हाण यांनी सत्तार यांच्या नावाचा विचार न करता सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज झाले. ’मी कुणावरही नाराज नाही. मी औरंगाबादमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी कॉंग्रेसचा राजीनामा आधीच दिलेला आहे. आता कॉंग्रेस आमदार म्हणून बोलत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत देणार आहे,’ अशी घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली होती.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधून कोणाला उमेदवारी द्यायची यावरून वाद सुरु होता. झांबड यांना उमेदवारी मिळणार यावर नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.