छत्रपती शिवरायांचे गुण माझ्यामध्ये आयुष्यभर राहावेत : उदयनराजे भोसले
   दिनांक :08-Apr-2019
 
 
 
मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, माझ्या लोकांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवरायांचे हेच गुण आयुष्यभर माझ्यामध्ये आहेत आणि ते आयुष्यभर राहावेत, अशी इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
 

 
 
 
उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. मागच्या जन्मी माझ्याकडून थोडं पुण्याचं काम घडलं असेल, म्हणून मी एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आलो. मी नेहमीच छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडून होईल तितके प्रयत्न करत असतो. उदयनराजे म्हणाले की, माझी दहशत आहे, आणि ती राहणारच, एखाद्या मुलीवर बलात्कार होत असेल तर मी शांतपणे पाहात नाही बसणार. परंतु लोक फक्त माझे दहशतीबाबतचं वक्तव्य पाहतात आणि केवळ त्याबाबतच बोलतात. दरम्यान कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण आणि भिडे गुरुजी यांच्याबाबतही उदयनराजे यांनी वक्तव्य केले आहे. उदयनराजे म्हणाले की, त्यांच्याबद्दल (भिडे गुरुजी) कोण काय म्हणतं, हे मला माहीत नाही, पण मला इतकं माहीत आहे, कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार झाला तेव्हा, भिडे गुरुजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगलीतल्या घरी होते. पाटील यांच्या घरात एक दुःखद घटना घडली होती. भिडे गुरुजी त्याच ठिकाणी होते. ते काय देव नाहीत, एकाच वेळी दोन ठिकाणी हजर असायला.