राहुल गांधी वायनाडमधून लढल्यास भाजपाला फायदा?
   दिनांक :08-Apr-2019
 
 
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता अमेठीसह केरळमधील वायनाडमधून देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यावर आता डाव्यांनी आपली नाराजी व्यक्त करत राहुल गांधी यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. कॉंग्रेसला उभारी देण्यास दक्षिण भारतानं मोठा हातभार लावला आहे असं इतिहासामध्ये पाहिल्यानंतर दिसून येतं. पण, आता कॉंग्रेसच्या फायद्याऐवजी राहुल गांधी यांच्या या निर्णयाचा भाजपला फायदा होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणं देखील तशीच आहेत. दक्षिण भारतामध्ये लोकसभेच्या 130 जागा येतात. राहुल गांधी यांच्या या निर्णयामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे. पण, सत्तास्थापनेची वेळ आल्यास कॉंग्रेसला डावे साथ देणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.
 

 
 
 
काय आहे कॉंग्रेसपुढील आव्हान
2008मध्ये वायनाड या मतदारसंघाची स्थापना झाली. 8 लाख मतदार संख्या असलेल्या वायनाडमध्ये 50 टक्के हिंदू, 28.65 टक्के मुस्लिम आणि 21 टक्के ख्रिश्चन आहेत. 2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसनं विजय मिळवला होता. कॉंग्रेस खासदार एम. एल. शहनवाझ यांचं निधन झाल्यामुळे सध्या वायनाडची जागा रिकामी आहे. 2009मध्ये कॉंग्रेसला 50 टक्के मिळाली होती. तर, 2014मध्ये कॉंग्रेसला 41 टक्के पेक्षा जास्त मतं मिळाली होती.2014मध्ये कॉंग्रेसला 20,870 मताचं मताधिक्य मिळालं होतं. या दोन्ही वेळी सीपीएमला पराभवाचा सामना करावा लागला होता. शिवाय, राहुल गांधी यांच्या निर्णयामुळे देखील आता डावे नाराज आहेत.
 
मोदी विरोधी मोहिमेला लगाम
राहुल गांधी यांच्या या निर्णयामुळे मोदी विरोधी मोहिमेला खिळ बसत असल्याची भावना डाव्यांची झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील कॉंग्रेस- डाव्यांची आघाडी झाली नाही. दक्षिण भारतात कर्नाटक व्यतिरिक्त भाजपची ताकद नाही. अशा वेळी देशात कॉंग्रेसनं लोकसभा निवडणुकीमध्ये 150 पेक्षा जास्त जागा िंजकल्यास कॉंग्रेसला भाजपविरोधकांची मदत लागेल. त्यामुळे केरळमध्ये कॉंग्रेसनं प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न केल्यास डावे नाराज होतील. त्यामुळे निवडणुकीनंतर गरज पडल्यास सत्ता स्थापन करताना डाव्यांच्या नाराजीचा कॉंग्रेसला फटका बसू शकेल. या सार्‍या बाबी लक्षात घेता वायनाडमधून राहुल गांधी लढत असल्याचा फायदा नेमका कुणाला होणार? यावर आता खल सुरू झाला आहे.