सीबीआयच्या याचिकेवर राजीव कुमार यांना नोटीस
   दिनांक :08-Apr-2019
- शारदा चिटफंड घोटाळा
नवी दिल्ली,
अटकेपासून दिलासा देणारे सुरक्षा कवच प्राप्त असलेले कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार, कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यातील तपासात सहकार्य करीत नसल्याने, त्यांना अटक करण्याची परवानगी मिळावी, या सीबीआयच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी राजीव कुमार यांना नोटीस जारी केली आहे.
 
 
 
राजीव कुमार यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई केली जाऊ नये, हा आपला आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागे घ्यावा, कारण या घोटाळ्यातील सत्यता बाहेर काढायची असेल, तर त्यांना अटक करणे, हाच एकमेव पर्याय आहे, अशी भूमिका सीबीआयने याचिकेत नमूद केली आहे. यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने राजीव कुमार यांना नोटीस जारी करून, चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
कुमार यांना न्यायालयाचे सुरक्षा कवच प्राप्त असल्याने, ते तपासात कुठलेही सहकार्य करीत नाही. हा घोटाळा फार मोठ्या कटाचा एक भाग असल्याने, सत्य बाहेर येणे आवश्यक आहे आणि कुमार यांना जोपर्यंत न्यायालयाचे कवच आहे, तोपर्यंत त्यांच्याकडून सत्य बाहेर काढता येणार नाही, असा युक्तिवादही सीबीआयने केला.