२३ वर्षानंतर एकत्र झळकणार शिवाजी साटम-अलका कुबल यांची जोडी
   दिनांक :08-Apr-2019
डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. धमाल कॉमेडी असलेला हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्तम कथा, दर्जेदार अभिनय, खुमासदार संवाद आणि विनोदाची मस्त फोडणी या साऱ्यांचा भरणा असलेल्या या चित्रपटामध्ये तब्बल २३ वर्षानंतर शिवाजी साटम आणि अलका कुबल पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत.



 
डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंगचा शिनेमा’ हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच शिवाजी साटम आणि अलका कुबल ही जोडी या चित्रपटात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारात आहेत. २३ वर्षांनी ते या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. ‘सीआयडी’फेम शिवाजी साटम आणि ‘माहेरची साडी’मुळे आजही लक्षात राहिलेली अलका कुबल यांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. हे दोघे तब्बल दोन दशकानंतर एकत्र येत असल्याने या चित्रपटाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
अलका कुबल या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशामुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या. शिवाजी साटम हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले आणि यशस्वी अभिनेते आहेत. १९९७ साली दूरचित्रवाणीवर आलेल्या ‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न या भूमिकेने ते घराघरात पोहचले आहेत.
पारंपारिक रितीरिवाजांपासून आधुनिक फॅशन- तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाप आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणाऱ्या बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’चा प्रदर्शित झालेला टीझर आणि तीन गाणी यांना रसिकांकडून भरपूर प्रतिसाद लाभला आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, भाऊ कदम, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे.