राहुलचे वायनाड आणि डाव्यांचे ‘पप्पू!’
   दिनांक :08-Apr-2019
 
 
 
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरला. अमेठीसह दोन लोकसभा मतदारसंघांतून आपण निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी घोषित केले. यामुळे डाव्या पक्षाच्या संतापाचा उद्रेक झाला नसता तरच नवल. प्रकाश करात, सीताराम येचुरी यांनी प्रारंभीच प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही राहुल गांधींना पराभूत करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावू. मुख्यमंत्री पिनाराई विजयन्‌ यांनी कॉंग्रेसला आव्हान दिले आहे की, त्यांची लढाई भाजपाविरोधात आहे, की डाव्यांविरोधात? राहुलच्या डाव्यांविरोधात लढण्याच्या निर्णयाने निवडणुकोत्तर आघाडीला चुकीचा संदेश गेला आहे. राहुल गांधींनी मात्र पडती भूमिका घेतली. ते म्हणाले, मी डाव्या नेत्यांच्या आणि पक्षाच्या विरोधात एकही शब्द बोलणार नाही. त्यांची टीका मी समजू शकतो, पण मी ती संपूर्ण टीका झेलीन. याचा अर्थ काय? मी डाव्यांवर टीका करणार नाही. मात्र, संयुक्त आघाडीच्या नेत्यांनी पिनाराई विजयन्‌ सरकारवर हल्ला केलेला चालेल. डावे इतके दूधखुळे नाहीत. त्यांना असे वाटते की, राहुलने वायनाडमधून उमेदवारी जाहीर करून एलडीएफलाच आव्हान दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर कॉंग्रेसचा डोळा आहे, ही बाब लपलेली नाही. त्यामुळे राहुलच्या या भूमिकेवर डाव्यांचे समाधान होणे शक्यच नव्हते. त्यांनी माकपाचे मुखपत्र असलेल्या ‘देशाभिमानी’मध्ये मथळा दिला- ‘कॉंग्रेसला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी पप्पूचा स्ट्राईक!’ या मुखपत्रात मथळ्यातच त्यांनी राहुलला पप्पू म्हणून टाकले. अतिशय तीव्र भाषेत असलेल्या या अग्रलेखात, राहुल गांधी यांना खरा शत्रू कोण हे कळलेलेच नाही. केरळात दोघांचाही समान प्रतिस्पर्धी भाजपा असताना, राहुल गांधी यांनी वायनाडमधून उभे राहणे म्हणजे डाव्यांसोबत थेट लढाई लढणे होय, असे नमूद आहे. भाकपाचे राज्यसभा सदस्य बिनॉय विश्वम प्रहार करताना म्हणाले, राहुल गांधींचे वायनाडमधून उभे राहणे, हे मूर्खपणाचे निदर्शक आहे.
 

 
 
हे खरे आहे की, मागील दोन निवडणुकांमध्ये वायनाडमधून कॉंग्रेसचा उमेदवार जिंकता आला आहे. 2009 साली तो अडीच लाख मताधिक्याने जिंकला होता. पण, 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराला फक्त 20 हजार मतांचेच आधिक्य मिळाले होते. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. कॉंग्रेस आणि डाव्यांचाही 2014 मध्ये दारूण पराभव झाला होता आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले होते. आज केरळमधील हिंदू जनमानस डाव्या लोकशाही आघाडीवर चिडले आहे. शबरीमलै प्रकरणी मुख्यमंत्री पिनाराई विजयन्‌ यांनी घेतलेली भूमिका त्यांना पसंत पडलेली नाही. हा एक मुद्दा. या मुद्यावरही मंथन सुरू झाले आहे. कॉंग्रेसने भाजपासारखीच भूमिका घेतल्यामुळे कॉंग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे की भाजपाच्या मार्गावर चालणारा, याचा खुलासा आधी राहुल गांधींनी करावा, अशी मागणी डाव्यांमधून पुढे आली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, डाव्या आघाडीच्या काळात भाजपा आणि संघस्वयंसेवकांच्या मोठ्या संख्येत झालेल्या हत्या. केरळमध्ये 45 टक्के हिंदू आहेत. 32 टक्के मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदाय दहा टक्के आहे. पण, ही आकडेवारी पुरेशी विश्वसनीय नाही. अनेकांचे म्हणणे आहे की, केरळमध्ये हिंदूंची संख्या त्यापेक्षा अधिक आहे. काहीही असले तरी यावेळी वायनाडमध्ये तिरंगी लढत होणार आहे आणि सार्‍या देशाचे लक्ष निकालाकडे लागून असणार आहे. अमेठीत मात्र यामुळे वेगळा संदेश गेला आहे. आता राहुल गांधींना आपली गरज नाही, असे लोक उघडपणे बोलत आहेत. त्याचे कारण म्हणजे राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षाची भूमिका. राहुुलचे म्हणणे आहे की, मला केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू अशा तिन्ही राज्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. हा उत्तर-दक्षिण असा संगम असेेल. तिकडे अमेठीत स्मृती इराणी राहुल गांधींवर सतत प्रहार करीत आहेत. राहुलने अमेठीच्या लोकांना वार्‍यावर सोडून पळ काढला, असा आरोप त्या करीत आहेत. स्वत: कॉंग्रेसलाही तेथे जिंकण्याची शाश्वती नाही.
 
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, वायनाडमध्ये राहुल गांधी यांची दारोमदार ही मुस्लिम मतांवर अधिक राहणार आहे. या मुस्लिम मतदारांमध्ये सर्वाधिक प्रभाव इंडियन युनियन मुस्लिम लीगचा आहे. हा संयुक्त लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांवर डोळा ठेवून कॉंग्रेसने हा जुगार खेळला आहे. आययुएमएल हा पक्ष आधी पाकिस्तानात होता. फाळणी झाल्यानंतर हा पक्ष जसा पाकिस्तानात जिवंत राहिला तसाच तो भारतातही कायम राहिला. मार्च 1948 मध्ये या पक्षाची मद्रास येथे स्थापना झाली. नंतर या पक्षाने आपले हातपाय पसरत प. बंगाल, केरळ या राज्यांत आपला जम बसविला. केवळ मुस्लिम राजकारण करणे, हा या पक्षाचा मुख्य उद्देश. वायनाड लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी तीन माकपाकडे, दोन कॉंग्रेसकडे, एक मुस्लिम लीगकडे व एका जागेवर अपक्ष निवडून आला आहे. त्यामुळे येथे राहुल गांधींना डाव्यांसोबत कडवी लढत द्यावी लागणार आहे. राहुलला मुस्लिम लीगची मदत घ्यावी लागणार आहे, त्याशिवाय राहुल गांधी यांची नय्या पार होणारी नाही. दुसरीकडे कॉंग्रेसपासून दुरावलेला हिंदू पुन्हा कॉंग्रेसकडे वळेल, असे त्या पक्षाच्या लोकांना वाटत आहे. पण, यावर अजूनही त्यांच्यात आत्मविश्वास नाही. भाजपा हा मुद्दा लावून धरणार असल्यामुळे त्याला कॉंग्रेस आणि आययुएमएल कसे प्रत्युत्तर देतात, हे आता पाहायचे. दुसरी बाब म्हणजे यावेळी संयुक्त लोकशाही आघाडीने कॉंग्रेसचे जे उमेदवार दिले आहेत, त्यावरूनही कॉंग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. डाव्या आघाडीने धर्मनिरपेक्ष छबी हा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.
 
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचाही जनाधार वाढला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वायनाडमधून भाजपा उमेदवाराने 80 हजारावर मते घेतली होती. ही टक्केवारी 8.82 एवढी आहे. याचा अर्थ, भाजपाचा जनाधार वाढत आहे. यामुळेच डावी आणि उजवी आघाडी िंचताग्रस्त आहे. यावेळी शबरीमलै प्रकरणामुळे भाजपाची मते किती वाढू शकतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले असेल. राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की, राहुलने वायनाडमधून उभे राहून डाव्या आघाडीला डिवचले आहे. त्यामुळे ते यावेळी पूर्ण ताकदीने उभे राहतील. गतवेळची 20 हजाराची लीड भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न डावी आघाडी करेल; तर भाजपाचे लक्ष्य दोन्ही आघाड्या असणार आहे. वायनाडमध्ये बंगलोर दक्षिणचे उमेदवार आणि उत्कृष्ट वक्ते तेजस्वी सूर्या यांनाही प्रचारासाठी आणण्याचा भाजपाचा विचार आहे. वायनाडमध्ये तिसर्‍या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिलला मतदान आहे. दोन टप्पे पार पडल्यावर भाजपाचे नेते केरळला लक्ष्य करणार आहेत. येथे लोकसभेच्या 20 जागा आहेत. यावेळची निवडणूक केरळसाठी अतिशय अटीतटीची राहणार, असे बोलले जात आहे. केरळमध्ये आलटून पालटून डाव्या आणि संयुक्त आघाडीचेच सरकार आतापर्यंत सत्तेवर राहात आले आहे. डाव्यांचा जनाधार देशात घटत आहे. हे पाहता डाव्या आघाडीसाठी एका परीने यावेळची लोकसभा निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.