त्या गर्भश्रीमंताने एकाचवेळी बँकेतून काढले तब्बल ६९ कोटी
   दिनांक :08-Apr-2019

कागदावर रुपये-पैशांचा आकडा अनेकांनी पाहिला आहे. मग ते ५ कोटी, १० कोटी, ५० कोटी कितीही मोठी रक्कम असो. कागदावर ही रक्कम पाहणे सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु सत्यात ही रक्कम कशी दिसत असेल? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. खासकरुन जेव्हा ती संपूर्ण रक्कम स्वत:ची असेल. ती ही कॅशच्या स्वरुपात. असाच प्रश्न नायजेरीयातील कोट्याधीश अलिको डंगोटे यांना पडला आहे. त्यांनाही याचा अनुभव घ्यायचा होता आणि त्यांनी तो घेतला सुद्धा.

 
 
 

अलिको हे अफ्रिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की त्यांनी त्यांच्या खात्यामधून ६९.२ कोटी रुपये (१० मिलियन डॉलर) कॅश काढली होती. अलिको यांना त्यांचे पैसे फक्त एकदा पहायचे होते. ‘मला फक्त अनुभवायचे होते की कागदावर दिसणारे मोठ मोठे आकडे सत्यात कसे दिसतात’ असे अलिको म्हणाले.

‘जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा एक मिलियन तुमच्यासाठी फार महत्वाचे असतात. त्यानंतर तुम्ही कितीही पैसे कमावले तरी त्याचे नवल नसते. अशा वेळी तुमच्या कडे जितके पैसे आहेत ते कॅशमध्ये समोर असल्याचा अनुभव एकदा तरी घ्यायला हवा’ असे अलिको म्हणाले.

एक दिवस अलिको अचानक बँकमध्ये गेले. त्यांनी ६९.२ कोटी (१० मिलियन) रुपये कॅश खात्यामधून काढली. ते पैसे गाडीच्या डिक्कीत टाकून अलिको घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी त्या पैशांनी एक संपूर्ण खोली सजवली. अलिको यांनी काही वेळ डोळे भरुन ते पैसे पाहिले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते पैसे बँकेच्या खात्यात जमा केले. त्यानंतर ते म्हणाले की, ‘आता माझा विश्वास बसला की माझाकडे इतके पैसे आहेत.’

अलिको नायजीरीयामधील एक व्यावसायिक आहेत. ‘Dangote group’ चे मालक आहेत. तसेच अफ्रिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत. त्यांच्याकडे १०.७ बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे.