अदानी यांच्या भूजल व्यवस्थापन योजनेस मंजुरी
   दिनांक :09-Apr-2019
- ऑस्ट्रेलियातील कोळसा खाण उभारणे एक पाऊल जवळ
मेलबॉर्न,
ऑस्ट्रेलियाच्या फेडरल सरकारने लक्षावधी डॉलर्सच्या भूजल व्यवस्थापन योजनेस मंजुरी दिल्याने भारतीय ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज अदानी समूह आता येथील कोळसा खाण उभारण्यासाठी एक पाऊल जवळ आली आहे. क्वीन्सलॅण्डमधील गॅलिल खोर्‍यातील ग्रीनफिल्ड कार्मिकल कोळसा खाण आणि उत्तरेतील बोवेनजवळ अॅबोट पॉईंट बंदराजवळीस खाण खरेदी करून अदानी समूहाने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियात प्रवेश केला होता.
 
 
 
क्वीन्सलॅण्ड राज्यातील मोठी कोळसा खाण वादाचा विषय ठरली आहे. या प्रकल्पात 2.3 अब्ज टन कमी दर्जाच्या कोळसा उत्पादनाची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त याचा परिणाम वातावरण बदलावर होईल, तसेच जागतिक वारसा असलेल्या येथील ग्रेट बॅरिअर रीफवरही होणार असल्याचे पर्यावरणवाद्यांनी म्हटले आहे. येथे खाण उभारल्यास काळ्या कंठाच्या गाणार्‍या पक्ष्याचा महत्त्वपूर्ण अधिवास नष्ट होईल, असा दावाही केला जात आहे.
अदानी समूहाने वैज्ञानिक गरजा पूर्ण केल्याचा अहवाल ‘कॉमनवेल्थ साइन्टिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन’ (सीएसआयआरओ) आणि ‘जिओसायन्स ऑस्ट्रेलिया’ने दिल्यावर या कंपनीच्या भूजल व्यवस्थापन योजनेस मंजुरी दिली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरण मंत्री मेलिसा प्राइस यांनी आज मंगळवारी दिली.
सीएसआयआरओ आणि जिओसायन्स ऑस्ट्रेलियाने रेल पायाभूत सुविधा आणि कार्मिकल कोळसा खाणीसाठी सादर करण्यात आलेल्या भूजल व्यवस्थापन योजनेची स्वतंत्रपणे तपासणी केली आहे. सादर करण्यात आलेली योजना वैज्ञानिक गरजा पूर्ण करणारी असल्याचे या दोन्ही संस्थांनी स्पष्ट केले आहे, असेही प्राइस यांनी सांगितले.
स्वतंत्र तपासणीनंतर पर्यावरण आणि ऊर्जा मंत्रालयाच्या पर्यावरण विभागानेही योजनेस मंजुरी देण्याची शिफारस केली आहे. देण्यात आलेला वैज्ञानिक सल्ला मी स्वीकारला असून, पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता कायदा 1999 अन्वये या दोन्ही संस्थांनी योजनेला मंजुरी दिली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.