अमेरिकाच जागतिक दहशतवादाचा म्होरक्या इराणचा पलटवार
   दिनांक :09-Apr-2019
तेहरान,
इराणच्या लष्कराला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकल्यानंतर, संतप्त झालेल्या इराणने आज मंगळवारी जोरदार पलटवार केला. अमेरिका हाच जागतिक दहशतवादाचा म्होरक्या असल्याचा आरोप इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी केला आहे. आमच्या रिव्हॉल्युशनरी गार्डस्ला दहशतवादी ठरविणारे तुम्ही कोण आहात, असा सवाल रोहानी यांनी राष्ट्राला टेलीव्हिजनवरून संबोधित करताना केला.
 
 
 
1979 मध्ये आमच्या लष्कराची स्थापना झाली आणि तेव्हापासून आमचे जवान सातत्याने दहशतवादाविरोधात लढा देत आहेत. आमच्या जवानांवर आम्हाला गर्व असताना, अमेरिकेने त्यांना दहशतवादी ठरवून, इराणचा अपमान केला आहे. सत्यता अशी आहे की, जगभरातील अनेक दहशतवादी संघटनांना अमेरिकेचेच पाठबळ मिळत असते, अनेक देशांविरुद्ध अमेरिकेने दहशतवादाचा वापर शस्त्र म्हणून वापर केला आहे, असा आरोप त्यांनी केला.
इसिसच्या म्होरक्यांना अमेरिकेनेच लपवून ठेवले आहे. त्यांना नेमके कुठे ठेवले आहे, हे जगाला सांगण्याचे धाडस अमेरिका दाखवेल काय, असा सवालही त्यांनी केला.