काँग्रेसच्या नेत्यांकडे नोटांचे बंडल सापडत आहेत - नरेंद्र मोदी
   दिनांक :09-Apr-2019
लातूर,
शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांवर आयकर विभागाने ठिकठिकांनी टाकलेल्या छापेमारीचा उल्लेख करत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. चौकीदार चोर आहे, असे गेल्या सहा महिन्यांपासून ते बोलत आहेत. मात्र नोटांचे बंडल त्यांच्याच नेत्यांच्या घरातच सापडले आहेत. त्यामुळे काँग्रेसच चोर असून त्यांना आता चौकीदाराची भीती वाटत आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
 
 
देशातून दहशतवाद नष्ट करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. काँग्रेसने आपल्या फायद्यासाठी त्यांना मोकळीक दिली, मात्र असे आता होणार नाही. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये घुसून आम्ही मारणार, ही नव्या भारताची नीती आहे, असे मोदी नरेंद्र म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये आम्ही राष्ट्रवाद्यांच्या मनात सकारात्मकता जागविली आहे. आता तिथे दहशतवादी कारवाया कमी झाल्या आहेत, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
 
 
काँग्रेसने जम्मू-काश्मीरमधून 370 हटवण्याची भाषा ढकोसलापत्रात (जाहीरनाम्यात) केली आहे, तिच भाषा पाकिस्तान करत आहे. काँग्रेसलाही फुटीरतावाद्यांशी चर्चा करायची आहे आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. अशा काँग्रेसवर तुम्ही विश्वास करु शकता का? असा सवालही नरेंद्र मोदींनी यावेळी केला.
याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही नरेंद्र मोदींनी लक्ष केले. काँग्रेसकडून जनतेला अपेक्षा नाहीत, पण शरदराव तुम्हीसुद्धा?... असा प्रश्न करत मोदींनी पवारांना इतरांपेक्षा वेगळे ठरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अनेकांचे कान टवकारले. राजकारण आपल्या जागी; परंतु, काश्मीर भारतापासून तोडू पाहणाऱ्यांसोबत, ज्यांना देशात दोन पंतप्रधान हवेत त्यांच्यासोबत शरदराव तुम्ही शोभून दिसत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
काँग्रेसचा जाहीरनामा हा केवळ मतांसाठी आहे, पण आमचे संकल्पपत्र हे मतदारांसाठी आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा केवळ 23 मे पर्यंत आहे, पण आमचे संकल्पपत्र हे पुढल्या काळातील विकासासाठी आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.