भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची घटल्याची शक्यता
   दिनांक :09-Apr-2019
काठमांडू,
नेपाळमध्ये 2015 साली झालेल्या भूकंपानंतर जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची घटल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या शिखराची उंची पुन्हा मोजण्यात येणार असल्याची माहिती आहे. नेपाळने सरकारद्वारे गिर्यारोहकांचे पथक नेमले आहे. ते उंची मोजण्यासाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
 
 
एव्हरेस्ट हे नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे. त्याची अधिकृत उंची 8,848 मीटर (29,029 फूट) इतकी आहे. 1954 मध्ये भारतीय सर्वेक्षण विभागाने पहिल्यांदा या शिखराची उंची मोजली होती. अनेकांनी शिखराची उंची मोजली होती. मात्र, 1954 साली केलेली मोजणी अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आली.
नेपाळमध्ये 2015 मध्ये झालेल्या भूकंपानंतर एव्हरेस्टची उंची कमी झाल्याचा दावा करण्यात आला होता. नेपाळ सरकारने या चर्चेला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. शिखराची नव्याने मोजणी करण्यासाठी नेपाळ सरकारने चार गिर्यारोहकांचे पथक नेमले आहे. 2017 मध्येच या पथकाच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली होती. ते पथक मोजणीसाठी पाठवण्यात आले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.