लखवीचा जामीन रद्द करा
   दिनांक :09-Apr-2019
- फेडरल तपास संस्थेची याचिका
इस्लामाबाद,
मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झकिउर रेहमान लखवीचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका पाकिस्तानच्या फेडरल तपास संस्थेने आज मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
 

 
 
लखवीला अटक करण्याात आल्यास, त्याची लगेच जामिनावर मुक्तता करण्यात यावी, असा आदेश विशेष न्यायालयाने 18 डिसेंबर 2014 रोजी दिला आहे. तेव्हापासून तो अज्ञात ठिकाणी लपून बसला आहे. तपास संस्थेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने, मुंबई हल्ल्याशी संबंधित सर्व नोंदी दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले. मुंबई हल्ल्याप्रकरणी सुनावणी करणार्‍या दहशतवादविरोधी विशेष न्यायालयाकडे हे सर्व रेकॉर्डस्‌ आहेत. या हल्ल्याप्रकरणी लखवी, अब्दुल वाजिद, मझहर इक्बाल, हमाद अमिन सिद्दिकी, शाहिद जमैल रियाज, जमैल अहमद आणि युनुस अंजुम या अतिरेक्यांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.
लखवीविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे असून, त्याला पुन्हा अटक करण्यासाठी त्याला मंजूर असलेला जामीन तातडीने रद्द करण्यात यावा, अशी विनंती तपास संस्थेने न्यायालयात विशद केली आहे.