राफेल पुनर्विचार याचिकांवर उद्या निर्णय
   दिनांक :09-Apr-2019
 
 
 
नवी दिल्ली: गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी राफेलवर देण्यात आलेल्या निर्णयाचा पुनर्विचार केला जावा, अशी विनंती करणार्‍या काही याचिकांवर सर्वोच्च न्यायालय उद्या बुधवारी आपला निकाल जाहीर करणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय किशन कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांचे न्यायासन हा निकाल देणार आहे.
 

 
 
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करणार्‍या सर्व याचिका फेटाळून लावताना हा व्यवहार पारदर्शक असल्याचे आणि यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट केले होते.
माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण आणि आम आदमी पार्टीचे खासदार संजयिंसह यांनी ही याचिका दाखल केली आहे.
मूळ याचिकेत केंद्र सरकारने सीलबंद लिफाफ्यात पूर्णतः चुकीची माहिती सादर केली. या माहितीवर न्यायालयाने विश्वास ठेवल्याचे अरुण शौरी, यशवंत सिन्हा आणि प्रशांत भूषण यांनी पुनर्विचार याचिकेमध्ये म्हटले आहे. त्यानंतर अधिक माहिती समोर आली आहे आणि त्यावर विचार न केल्याने परिपूर्ण न्याय दिला गेला नाही, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे.