ह्यू रोझ आयलॅण्ड
   दिनांक :09-Apr-2019
पर्यटनाच्या दृष्टीने फार लोकप्रिय नसलेले, वस्ती नसलेले. 0.69 स्क्वेअर कि.मी. एवढा कमी भूभाग असलेले हे द्वीप आहे. ‘ह्यू रोझ’ या नावाचा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात एक मोठा अध्याय आहे, एवढे या आयलॅण्डचे महत्त्व आहे. अंदमानच्या पोर्टब्लेअरपासून साधारण 40 कि.मी. अंतरावर नील आयलॅण्डजवळ असलेले हे द्वीप आहे. नील द्वीपाजवळ असल्यामुळे याला छोटा नीलही म्हणतात. या द्वीपाला इथल्या समृद्ध वनश्रीमुळे वाइल्ड लाईफ सेंच्युअरीचा दर्जा देण्यात आला आहे. इथे जाण्याकरिता डेप्युटी रेंज फॉरेस्ट ऑफिसर, नील आयलॅण्डच्या कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते. बोटीने इथे जायला साधारण दोन हजार रुपये लागतात. संध्याकाळी परत यावे लागते. समुद्री कासवांचे अंडी देण्याचे हे स्थान आहे. म्हणून त्याला संरक्षण दिलेले आहे.
 

 
 
फील्ड मार्शल ह्यू रोझ महू (मध्यप्रदेश) येथून 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामाचे दमन करण्याकरिता निघाला. वाटेत सागर, गढाकोटाण मदनपूर या छोट्या राज्यांवर त्याने अधिकार केला. याच वेळेला 1857 च्या संग्रामाची धुरा महाराणी लक्ष्मीबाईने सांभाळली होती. इंग्रजांना राणीसाहेबाने रोखून ठेवले होते. 10 मार्च 1858 ला ह्यू रोझ झांसी येथे आला आणि चित्र बदलू लागले. 4 एप्रिल 1857 ला त्याने झांसीवर विजय संपादन केला. झांसी गावाच्या सर्व नागरिकांची हत्या केली आणि झांसी जाळून बेचिराख केले. झांसीच्या पडावाचे शल्य पचवून राणी लक्ष्मीबाई झांसीहून, पुत्र दामोदरला घेऊन निसटल्या आणि तात्या टोपे व रावसाहेब (नानासाहेब पेशव्यांचा पुतण्या) यांना सामील झाल्या. तात्या टोपे यांचा भक्कम पािंठबा मिळाल्यामुळे राणीसाहेबांनी नव्या दमाने इंग्रजांना लढा देणे सुरू केले. याच सुमारास ह्यू रोझचे विजयसत्र चालूच होते. मे 1858 ला राणीसाहेबांच्या फौजेला शिकस्त देऊन काल्पी काबीज केले. यानंतर जूनमध्ये ग्वालियर पडले. ग्वालियरच्या युद्धानंतर राणीसाहेबांना आसरा राहिला नाही, परंतु खचून न जाता या देवीतुल्य महान स्त्रीने मोजकेच शिपाई उरलेले असतानाही इंग्रजांना बेजार केले होते.
 
18 जून 1858 ला ह्यू रोझच्या नेतृत्वात कॅप्टन हेन्रीजने महाराणी लक्ष्मीबाईंना ग्वालियरजवळ कोटा की सराय, फुलबाग येथे घेरले. घोड्याची लगाम दातात धरून दोन्ही हाताने तलवारीचे वार करत राणीसाहेब शत्रूंना कंठस्नान घालत होत्या. घेराबंदी तोडून राणीसाहेब निघाल्या. समोर पाण्याचा एक ओढा होता, घोडा नवखा असल्यामुळे अडला आणि एक इंग्रज शिपाई जवळ आला. त्याच्या तलवारीचा वार राणीसाहेबांच्या डोक्यावर पडला. डोके फुटून रक्ताची धार लागली. राणीसाहेब घोड्यावरून खाली पडल्या. सोबत असलेल्या सैनिकांनी त्यांना उचलून एका मंदिरात नेऊन बसविले. ‘‘माझा मृतदेह इंग्रजांच्या ताब्यात पडू देऊ नका. दामोदरला सुरक्षित ठिकाणी घेऊन जा...’’ एवढा आदेश देऊन राणीसाहेब गतप्राण झाल्या. मंदिराच्या पुजार्‍याने घाईघाईने चीता रचली आणि राणीसाहेबांचा देह अग्नीच्या स्वाधीन केला. सोबत असलेले 3 सैनिक इंग्रजांना रायफलच्या मार्‍याने रोखत होते. एक एक करत तिन्ही सैनिक इंग्रजांच्या फायरिंगला बळी पडले. कॅप्टन हेन्रीज मंदिरात आला, त्याच्यासमोर राणीसाहेबांची विझत चाललेली चीता होती.
 
ह्यू रोझने आपल्या पुस्तकात नोंद केली- ‘‘क्लेव्हर अॅण्ड ब्युटीफुल, मोस्ट डेंजरस इंडियन लीडर, मॅन एमंगस्ट फ्रीडम फायटर्स इज नो मोअर व्हाटएवर शी डिड, शी डिड फॉर हर कंट्री.’’ भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या सर्वात देदीप्यमान तार्‍याला हुतात्मा बनवणार्‍या सर ह्यू रोझचे नाव अंदमानच्या द्वीपाला देऊन ब्रिटिश सरकारने त्याचा गौरव केला. आपण भारतीयांनी फुलबाग ग्वालियरला राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या उपकाराची परतफेड करावी, एवढीच माफक अपेक्षा.
 संजय गोखले
9422810501