इस्रायलच्या निवडणुकीतही 'चौकीदार'
   दिनांक :09-Apr-2019
नवी दिल्ली:
भारतात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. इथल्या निवडणुकीत सध्या 'चौकीदार' हा शब्द सुपरहिट ठरला आहे. दुसरीकडे मित्रराष्ट्र असलेल्या इस्रायलमध्येही मंगळवारी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होत आहे. तेथील निवडणुकीतही 'चौकीदार' हिट ठरला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हेही देशाचा 'चौकीदार' असल्याचं सांगत आहेत.
 
 
 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा 'चौकीदार' असल्याचं सांगत आहेत. तर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे 'मिस्टर सेक्युरिटी' असल्याचं सांगत आहेत. मोदींप्रमाणे नेतान्याहू यांच्यासाठीही निवडणूक आव्हानात्मक आहे. मात्र, पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वास त्यांना आहे. इस्रायलमध्ये आजपासून (९ एप्रिल) मतदानाला सुरुवात झालीय. तर भारतामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला ११ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.
पंतप्रधानपदी पाचव्यांदा विराजमान होऊ, असा निर्धार इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान आणि दक्षिणपंथी लिकूड पार्टीचे नेते नेतान्याहू यांनी केला आहे. मात्र, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यांच्यासमोर निवृत्त जनरल बेनी गँट्स यांचे कडवे आव्हान आहे. ब्ल्यू अँड व्हाइट आघाडीचे प्रमुख गँट्स यांनी प्रचारात सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसंच पारदर्शी राजकारणाचं आश्वासन त्यांनी जनतेला दिलंय.