किश्तवाडमध्ये रुग्णालयावर दहशतवादी हल्ला
   दिनांक :09-Apr-2019
किश्तवाड,
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील एका रुग्णालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्याला टार्गेट करण्यासाठी हा हल्ला केला असून त्यात संघाचा हा नेता जखमी झाला आहे. या हल्ल्यात त्याचा बॉडीगार्डही ठार झाला आहे. बुरखा परिधान करून हे दहशतवादी आले होते, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
  
 
चंद्रकांत असं या संघाच्या नेत्याचं नाव आहे. ते येथील एका रुग्णालयात ओपीडीमध्ये असताना बुरखा परिधान करून काही दहशतवादी हॉस्पिटलमध्ये घुसले. ओपीडीमध्ये येऊन या दहशतवाद्यांनी चंद्रकांत यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात चंद्रकांत गंभीर जखमी झाले तर त्यांचा बॉडीगार्ड जागीच ठार झाला. गोळीबारानंतर बॉडीगार्डकडील शस्त्र घेऊन हे दहशतवादी पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं.
या दहशतवाद्यांनी रुग्णालयात घुसून गोळीबार करताच रुग्णालयात एकच घबराट पसरली. रुग्णांनी मिळेल त्या दिशेने धाव घेत स्वत: चे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी धावपळ सुरू करताच गोळीबार करून या अतिरेक्यांनी तिथून पळ काढला. दरम्यान, बुरखा परिधान करून आलेले अतिरेकी पुरुष होते की महिला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. रुग्णालयाबाहेर पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी सुरू असल्याचं सांगण्यात येतं.