लालूंना जामीन दिल्यास, ते राजकारणात सक्रिय होतील
   दिनांक :09-Apr-2019
- सीबीआयची न्यायालयात भूमिका
नवी दिल्ली, 9 एप्रिल
सध्या लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण आहे. अशा स्थितीत कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेले राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्यात आल्यास, ते राजकारणात सक्रिय होतील, अशा शब्दात सीबीआयने लालूंच्या जामीन अर्जाला आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात विरोध केला. लालूप्रसाद जामीन मागत असले, तरी ते या स्वातंत्र्याचा गैरवापर करण्याचीच शक्यता जास्त आहे, असे सीबीआयतर्फे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या न्यायासनापुढे स्पष्ट करण्यात आले.
 

 
 
लालूप्रसाद यादव आठ महिने उपचारासाठी रुग्णालयात होते. तिथे त्यांना विशेष कक्ष देण्यात आला होता. या संपूर्ण काळात त्यांनी राजकीय कामकाजच केले. दररोज शेकडो लोक त्यांची भेट घेण्यासाठी यायचे. आपली प्रकृती चांगली नसल्याने कारागृहात राहू शकत नाही, असे सातत्याने सांगणार्‍या लालूंची प्रकृती ठणठणीत कशी झाली, असा सवालही सीबीआयने उपस्थित केला.