जवानांच्या सन्मानासाठी भाजपाला मतदान करा, मोदींचे आवाहन
   दिनांक :09-Apr-2019
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला असून पहिल्यांदाच ते मतदान करणार आहेत. या नवमतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील सभेत केला. जवानांच्या सन्मानासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नवमतदारांना केले.

 
 
नवमतदारांना आवाहन करताना मोदी म्हणाले, तुमचे पहिले मत एअर स्ट्राईक करणाऱ्यांना, पुलवामात शहीदांना, गरीबांना पक्की घर मिळावे यासाठी, शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी, आयुष्यमान भारत योजना यशस्वी होण्यासाठी जाईल का? समाजाने तुम्हाला बरेच काही दिले त्यामुळे तुमचे पहिले मत देशासाठी जायला, हवे. त्यासाठी जर तुम्ही कमळावरचे बटन दाबाल तर तुमचे मत मोदीला जाईल असे ते यावेळी म्हणाले.
 
घराणेशाही चालवणाऱ्या राजकीय पक्षांना टोला लगावताना मोदींनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे उदाहरण दिले. मोदी म्हणाले, जर बाळासाहेबांना वाटलं असतं तर ते स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, अन्यथा त्यांनी उद्धव ठाकरेंना तरी मुख्यमंत्री केलं असतं. मात्र, त्यांनी तसे केलं नाही त्यांच्यात त्यागाची भावना असून त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे.
गेल्या सहा महिन्यांपासून विरोधक चौकीदार चोर असल्याचा प्रचार करीत आहेत. मात्र, प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात काँग्रेसच्या नेत्यांकडून नोटांची बंडले निघत आहेत. मध्य प्रदेशात सत्ता घेऊन सहा महिनेही झाले नाहीत, तर त्यांच्या मोठ्या बंगल्यातून करोडोचे धन बाहेर पडत आहे. त्यांना या चौकीदाराचे भय वाटतं आहे आणि म्हणूनच ते चौकीदाराला शिव्या देत आहेत, असा टोलाही मोदींनी यावेळी काँग्रेसला लगावला.